For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंग्लंडने रचला इतिहास, पाकचा लाजिरवाणा पराभव

06:59 AM Oct 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
इंग्लंडने रचला इतिहास  पाकचा लाजिरवाणा पराभव
Advertisement

मुलतान कसोटीत विक्रमांचा पाऊस : पाकिस्तानचा इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव  

Advertisement

वृत्तसंस्था/ मुलतान

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा संघ 500 हून अधिक धावा करूनही सामना हरला. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात मुलतान येथे झालेल्या कसोटी सामन्यात हा विक्रम झाला. या कसोटीत पाकिस्तानने पहिल्या डावात 556 धावा केल्या होत्या. यानंतर हॅरी ब्रुकचे तिहेरी शतक आणि जो रूटच्या द्विशतकाच्या जोरावर इंग्लंडने 823 धावा केल्या व पाकिस्तानवर 267 धावांची आघाडी घेतली. पाक संघ दुसऱ्या डावात 220 धावांत सर्वबाद झाला. इंग्लंडने हा सामना एक डाव आणि 47 धावांनी जिंकला. विशेष म्हणजे, कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात पाकिस्तानला हा सर्वात मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये पहिल्या डावात 556 धावा करून डावाने पराभूत होणारा पाकिस्तान हा एकमेव संघ ठरला आहे. मुलतान कसोटी जिंकून इंग्लंडने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Advertisement

मुलतान येथे पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि पहिल्या डावात 3 शतकांच्या जोरावर 556 धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 823 धावांचा डोंगर उभा केला, त्यापुढे पाकिस्तानी संघाने शरणागती पत्करली. खेळाच्या शेवटच्या दिवशी पाकिस्तानने 152 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली आणि त्यांच्या हातात 4 विकेट शिल्लक होत्या. पण पाक संघ पाचव्या दिवशी मैदानावर एक सत्रही टिकू शकला नाही. अकरावा खेळाडू अबरार अहमद आजारी असल्याने तो फलंदाजीसाठी मैदानावर येऊ शकला नाही. सलमान आगाने सर्वाधिक 7 चौकारासह 63 धावांचे योगदान दिले. तर आमीर जमाल 55 धावांवर नाबाद राहिला. सलमान आगा बाद झाल्यानंतर मात्र शाहिन शाह आफ्रिदी 10 तर नसीम शाह 6 धावांवर बाद झाले. मुलतानच्या या पाटा खेळपट्टीवर पाकचा संघ 54.5 षटकांत 220 धावांत ऑलआऊट झाला. इंग्लंडकडून जॅक लीचने सर्वाधिक 4 बळी घेतले. कार्स व अॅटकिन्सन यांनी प्रत्येकी दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला.

पाकची पराभवाची मालिका कायम

कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा हा सलग सहावा पराभव आहे. गेल्या 9 कसोटी सामन्यांमधील पाकिस्तानचा हा सातवा पराभव आहे. पाकिस्ताननं 2022 पासून घरच्या मैदानावर एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. या कालावधीत पाकिस्ताननं 7 कसोटी गमावल्या असून 4 सामने अनिर्णित राहिले आहेत.

संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान प.डाव 556 व दुसरा डाव 54.5 षटकांत सर्वबाद 220 (सईम आयुब 25, सौद शकील 29, सलमान आगा 63, जमाल नाबाद 55, लीच 4 बळी, अॅटकिन्सन व कार्स प्रत्येकी दोन बळी).

इंग्लंड प.डाव 7 बाद 823 घोषित.

 147 वर्षाच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिलीच घटना

क्रिकेट इतिहासात पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात मार्च 1877 मध्ये खेळला गेला. तेव्हापासून 147 वर्षे झाली आहेत. या काळात, अनेक जागतिक विक्रम झाले आणि मोडले गेले. पण, शुक्रवारी मुलतान कसोटीतील पराभवासह पाकिस्तानवर एक लाजिरवाणा विक्रमही जमा झाला आहे. कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की पहिल्या डावात 500 हून अधिक धावा करूनही एखाद्या संघाने कसोटी सामना गमावला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजवर कोणत्याही संघाला  अशाप्रकारे पराभवाचा सामना करावा लागला नाही.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून पाकिस्तान जवळपास बाहेर

मुलतान कसोटीपूर्वी, पाकिस्तान संघाची टक्केवारी 19.50 होती, जी आता 16.67 झाली आहे. तर विंडीज संघाला न खेळताही एका स्थानाची बढती मिळाली आहे. वेस्ट इंडिजचा संघ आता 18.52 टक्क्यांसह आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. इंग्लंडची टक्केवारी 42.190 होती, जी आता वाढून 45.59 टक्के झाली आहे. मात्र, त्यानंतरही त्यांना चौथ्या स्थानावरच रहावे लागणार आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघ अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

Advertisement
Tags :

.