टी-20 मालिकेतही इंग्लंडकडून इंडिजचे क्लीन स्वीप’
तिसऱ्या सामन्यात विंडीजवर 37 धावांनी विजय, डकेट सामनावीर, बटलर मालिकावीर, वुडचे 3 बळी, पॉवेलचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था/ साऊदम्प्टन, इंग्लंड
यजमान इंग्लंडने विंडीजचा तिसऱ्या टी-20 सामन्यात 37 धावांनी पराभव करून 3-0 असा एकतर्फी मालिकाविजय मिळविला. 84 धावा व दोन झेल टिपणाऱ्या बेन डकेला सामनावीर तर मालिकेत 165 धावा करणाऱ्या जोस बटलरला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
हायस्कोअरिंगच्या या सामन्यात विंडीजकडून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर इंग्लंडने 20 षटकांत 3 बाद 248 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजला 8 बाद 211 धावांवर रोखत इंग्लंडने सामन्यासह मालिकेत क्लीन स्वीप विजय हस्तगत केला.
इंग्लंडचा ही आजवरची टी-20 मधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यांच्या डावात सलामीवीर बेन डकेटने 46 चेंडूत 84 धावा फटकावताना जेमी स्मिथसमवेत केवळ 8.5 षटकांत 120 धावांची भक्कम सलामी दिली. स्मिथने 26 चेंडूत 5 षटकार, 4 चौकारांसह 60 धावा झोडपल्या तर डकेटने आपल्या खेळीत 10 चौकार, 2 षटकार मारले. 10 षटकांत 1 बाद 135 धावा जमवित इंग्लंडने आजवरच्या सर्वोच्च धावा जमविल्या. एकदा पकड मिळविल्यानंतर इंग्लंडने अखेरपर्यंत ती सैल होऊ दिली नाही. कर्णधार हॅरी ब्रुकने 22 चेंडूत नाबाद 35, जेकब बेथेलने 16 चेंडूत 1 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 36 धावा जमविताना दोघांनी 31 चेंडूत अभेद्य 70 धावांची भागीदारी केली. याशिवाय जोस बटलरने 10 चेंडूत 1 चौकार, 2 षटकारांसह 22 धावा जमविल्या. विंडीजच्या अकील हुसेन, गुडाकेश मोती, शेरफेन रुदरफोर्ड यांनी एकेक बळी मिळविला.
फलंदाजीस अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर विंडीजला हे आव्हान पेलवले नाही. 7.1 षटकांत 4 बाद 70 अशा स्थितीनंतरही त्यांनी निर्धारित षटकांत 8 बाद 211 धावांपर्यंत मजल मारली. रोवमन पॉवेलने 45 चेंडूत नाबाद 79 धावा फटकावल्या. त्यात 9 चौकार, 4 षटकारांचा समावेश होता. कर्णधार शाय होपने 27 चेंडूत 3 चौकार, 3 षटकारांसह 45 धावा फटकावल्या. याशिवाय जेसन होल्डरने 12 चेंडूत 25, शिमरॉन हेटमायरने 8 चेंडूत 1 चौकार, 3 षटकारांसह 26 धावा तडकावल्या. इंग्लंडच्या ल्युक वुडने 31 धावांत 3, आदिल रशिदने 30 धावांत 2, ब्रायडन कार्से, लियाम डॉसन, जेकब बेथेल यांनी एकेक बळी मिळविले.
याआधी इंग्लंडने वनडे मालिकाही 3-0 अशाच फरकाने जिंकली असल्याने इंग्लंडचा नवा कर्णधार बुक्रसाठी ही चांगली सुरुवात आहे. इंग्लंड संघ आता कसोटीकडे लक्ष केंद्रित करणार असून भारताविरुद्ध त्यांची पाच सामन्यांची बहुचर्चित कसोटी मालिका होणार आहे. 20 जूनपासून त्याची सुरुवात होईल.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 20 षटकांत 3 बाद 248 : जेमी स्मिथ 26 चेंडूत 60, बेन डकेट 46 चेंडूत 84, बटलर 10 चेंडूत 22, हॅरी ब्रुक 22 चेंडूत नाबाद 35, बेथेल 16 चेंडूत नाबाद 36, अवांतर 11. अकील हुसेन 1-42, गुडाकेश मोती 1-44, रुदरफोर्ड 1-20.
विंडीज 20 षटकांत 8 बाद 211 : शाय होप 27 चेंडूत 45, हेटमायर 8 चेंडूत 26, रोवमन पॉवेल 45 चेंडूत नाबाद 79, होल्डर 12 चेंडूत 25, अवांतर 15. ल्युक वुड 3-31, आदिल रशिद 2-30, कार्से 1-63, डॉसन 1-34, बेथेल 1-32.