इंग्लंडचे 407 धावांत पॅकअप, सिराजचे 6 बळी
हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांची शतके, सिराजचे 6 तर आकाश दीपचे 4 बळी : तिसऱ्या दिवशी भारताच्या 1 बाद 64 धावा
वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
मोहम्मद सिराज (6 बळी) आणि आकाशदीप (4 बळी) या वेगवान गोलंदाजांनी जोरदार कमॅबक करत इंग्लंडला 407 रन्सवर रोखण्यात यश मिळवले आहे. भारताने कर्णधार शुभमन गिलच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर 569 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ या जोडीने सहाव्या विकेटसाठी 369 चेंडूंमध्ये 303 धावांची भागीदारी केली. या दोघांनी दीडशतकी खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला 400 पार पोहचता आले. हॅरी आणि जेमीचा अपवाद वगळता इंग्लंडच्या इतर फलंदाजांनी सिराज आणि आकाशसमोर गुडघे टेकले. भारताने शेवटच्या 5 विकेट्स या 20 धावांच्या मोबदल्यात घेतल्या आणि इंग्लंडला गुंडाळले. यानंतर तिसऱ्या दिवसअखेरीस भारतीय संघाने 1 बाद 64 धावा करत महत्वपूर्ण अशी 244 धावांची आघाडी मिळवली आहे. दिवसअखेरीस केएल राहुल 28 तर करुण 7 धावांवर खेळत होता.
भारताने पहिल्या डावात सर्वबाद 587 धावा केल्या. मात्र आकाश दीप आणि मोहम्मद सिराज या दोघांनी धारदार बॉलिंगच्या जोरावर इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे भारतीय संघाकडे इंग्लंडला फॉलोऑन देण्याची संधी होती. मात्र जेमी स्मिथ याने खेळच बदलला. जेमीने टेस्टमध्ये टी 20 स्टाईल शतक ठोकलं. जेमीने प्रसिध कृष्णाच्या एका ओव्हरमध्ये 23 धावा केल्या. तिसऱ्या दिवशी जेमी आणि ब्रूकच्या फलंदाजीसमोर भारतीय गोलंदाज सपशेल फेल ठरल्याचे पहायला मिळाले.
स्मिथ, ब्रूकचा शतकी धमाका
इंग्लंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 77 धावांवर 3 विकेट्स गमावल्या. त्यानंतर मोहम्मद सिराजने तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या ओव्हरमधील सलग 2 चेंडूंमध्ये जो रुट आणि बेन स्टोक्स यांना आऊट केले. त्यामुळे इंग्लंडची स्थिती 5 आऊट 84 अशी झाली. त्यानंतर हॅरी ब्रूकला साथ देण्यासाठी जेमी स्मिथ मैदानात आला. जेमी आणि हॅरी या जोडीने कोणत्याही दबावात न खेळता भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. विशेष म्हणजे, सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जेमी स्मिथने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. ज्यावेळी तो फलंदाजीला आला त्यावेळी इंग्लंडचा डाव फसलेला होता. मात्र, त्याने मागचा पुढचा विचार न करता मिळालेल्या संधीचा फायदा घेतला. भारतीय गोलंदाजांनी त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करताना शॉर्ट आणि बाऊंसर चेंडूंचा वापर केला. मात्र, स्मिथने ही संधी समजून मोठे फटके मारले. चौकारांचा पाऊस पाडत त्याने 80 चेंडूत 126.25 च्या स्ट्राईक रेटने शतक पूर्ण केले. जेमीने या शतकी खेळीत 14 चौकार आणि 3 षटकार ठोकले. जेमीच्या कसोटी कारकीर्दीतील हे दुसरे शतक ठरले.
हॅरी ब्रूकनेही त्याला चांगली साथ देताना शतकी खेळी साकारली. ब्रूकने आपल्या कसोटी कारकीर्दीतील नववे शतक साजरे करताना 210 चेंडूत 15 चौकार आणि 1 षटकारासह 140 धावांची खेळी साकारली. ब्रूक आणि स्मिथने सहाव्या गड्यासाठी 271 धावांची भागीदारी करताना इंग्लंडला साडेतीनशेचा टप्पा गाठून दिला. चहापानासाठी खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने 75 षटकांत 5 गडी गमावत 355 धावा केल्या होत्या. चहापानानंतर भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या या जोडीला आकाशदीपने फोडले. त्याने ब्रूकला 158 धावांवर माघारी पाठवले. टीम इंडियाने या विकेटसह कमबॅक केले आणि इंग्लंडला 20 धावांच्या मोबदल्यात 5 झटके दिले. यासह इंग्लंडचे 407 रन्सवर पॅकअप केले. भारताकडून आकाशदीपने 4 तर मोहम्मद सिराजने 6 बळी घेतले.
टीम इंडियाला 244 धावांची आघाडी
इंग्लंडला 407 धावांत गुंडाळल्यानंतर दुसऱ्या डावात खेळताना भारतीय संघाला आठव्या षटकांत पहिला धक्का बसला. यशस्वी जैस्वाल 28 धावा काढून बाद झाला. यानंतर दिवसअखेरीस केएल राहुल आणि करुण नायर यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 1 गडी गमावत 64 धावा केल्या होत्या. केएल 28 तर करुण नायर 7 धावांवर खेळत होता.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव सर्वबाद 587
भारत दुसरा डाव 13 षटकांत 1 बाद 64 (यशस्वी जैस्वाल 28, केएल राहुल खेळत आहे 28, करुण नायर खेळत आहे 7, टंग 1 बळी).
इंग्लंड पहिला डाव 89.3 षटकांत सर्वबाद 407 (जॅक क्रॉली 19, बेन डकेट 0, ओली पोप 0, जो रुट 22, बेन स्टोक्स 0, हॅरी ब्रूक 158, जेमी स्मिथ नाबाद 184, मोहम्मद सिराज 6 तर आकाशदीप 4 बळी).
इंग्लंडसाठी कसोटीत वेगवान शतक
भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा युवा फलंदाज जेमी स्मिथने कसोटी कारकीर्दीतील हे दुसरे शतक झळकावले. जेमीने या शतकासह हॅरी ब्रूकच्या विक्रमाची बरोबरी केली. जेमी इंग्लंडसाठी वेगवान शतक करणारा संयुक्तरित्या तिसरा फलंदाज ठरला.
इंग्लंडसाठी कसोटीत वेगवान शतक
76 चेंडू, गिल्बर्ट जेसप, वि ऑस्ट्रेलिया, 1992
77 चेंडू, जॉनी बेयरस्टो, वि न्यूझीलंड, 2022
80 चेंडू, जेमी स्मिथ, वि टीम इंडिया, 2025
80 चेंडू, हॅरी ब्रूक, वि पाकिस्तान, 2022.
प्रसिध कृष्णाची धुलाई
प्रसिद्ध कृष्णाला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र, दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. प्रसिद्धने एकाच षटकात 23 धावा खर्च केल्या. यासह त्याच्या नावे कसोटी क्रिकेटमधील नकोसा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. प्रसिद्ध क्या डावात सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 32 व्या षटकात गोलंदाजी करताना 23 धावा खर्च केल्या. जेमी स्मिथने प्रसिद्ध कृष्णाच्या षटकात 0,4,6,4,4, वाईड, 4 अशा एकूण 23 धावा वसूल केल्या. यासह तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात चौथे सर्वात महागडे षटक टाकणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे.