इंग्लंडची 5 गड्यांनी भारतावर मात
यजमानांची मालिकेत आघाडी, डकेट सामनावीर, रूट, क्रॉले यांची अर्धशतके
वृत्तसंस्था/ लीड्स, इंग्लंड
सामनावीर बेन डकेटचे शतक आणि झॅक क्रॉले, जो रूट यांच्या अर्धशतकांच्या बळावर इंग्लंडने पहिल्या कसोटीत भारतावर 5 गड्यांनी विजय मिळवित पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. डकेटने पहिल्या डावात 62 व दुसऱ्या डावात 149 धावांचे योगदान दिल्याने तो सामनावीराचा मानकरी ठरला. दुसरी कसोटी 2 जुलैपासून बर्मिंगहॅम येथे होणार आहे.
इंग्लंडला 371 धावांचे आव्हान मिळाले होते. अखेरच्या दिवशी त्यांनी 82 षटकांत 5 बाद 373 धावा जमवित शानदार विजय साकार केला. सर्वाधिक धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने भारतावर मिळविलेला हा दुसरा विजय आहे. याआधी 2022 मध्ये बर्मिंगहॅम कसोटीत 378 धावांचे आव्हान इंग्लंडने 3 गड्यांच्या मोबदल्यात गाठले होते. भारतीय फलंदाजांनी चमकदार प्रदर्शन करीत सामन्यातील सातपैकी पाच शतके झळकवली. पण बुमराह वगळता निष्प्रभ गोलंदाजी आणि गचाळ क्षेत्ररक्षण याचा सर्वाधिक फटका बसल्याने तसेच नवा कर्णधार डावपेचात कमी पडल्याने भारताला पराभवाला सामोरे जावे लागले.
अखेरच्या सत्रात बेन स्टोक्स 33 धावा काढून बाद झाल्यानंतर अनुभवी रूट व जेमी स्मिथ यांनी आणखी पडझड होऊ न देता विजय साकार केला. रूट 84 चेंडूत 53 तर स्मिथ 55 चेंडूत 44 धावा काढून नाबाद राहिला. भारताच्या कृष्णा, शार्दुल यांनी प्रत्येकी 2 तर जडेजाने एक बळी मिळविला.
शतकी सलामी
चौथ्या दिवशी भारताचा दुसरा डाव 364 धावांत आटोपल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात दिवसअखेर बिनबाद 21 धावा जमविल्या होत्या. या धावांवरून पाचव्या व अखेरच्या दिवसाच्या खेळाला इंग्लंडने पुढे सुरुवात केली आणि उपाहारापर्यंतच्या सत्रात भारतीय गोलंदाजांना एकही यश मिळविता आले नाही. इंग्लंडच्या बेन डकेट व झॅक क्रॉले यांनी सावध व अधूनमधून आक्रमक फटकेबाजी करीत उपाहारापर्यंत बिनबाद 117 धावा जमविल्या होत्या. यावेळी डकेट 64 तर क्रॉले 42 धावांवर खेळत होते.
बुमराह वगळता भारताच्या प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज व शार्दुल ठाकुर या अन्य गोलंदाजांना प्रभावी मारा करता आला नाही. त्यांनी स्वैर मारा करीत फलंदाजांना अनेकदा धावा बहाल केल्या. इंग्लंडच्या फलंदाजांनी याचा पुरेपूर लाभ घेत धावा वसूल केल्या. बुमराह एका अप्रतिम ऑफकटरवर डकेटचा बचाव भेदला होता. पण त्यातून तो बचावला. कसोटी सलामीवीर म्हणून डकेट व क्रॉले यांनी 2000 हून अधिक धावा जमविल्या. शॉर्ट, पूर्ण टप्प्यावर पडलेल्या चेंडूला ते कट्स, पुल्स आणि ड्राईव्ह करीत होते. त्यामुळे पहिल्या सत्रात इंग्लंडने 96 धावांची भर घातली. बुमराहला सावधपणे खेळत धोका पत्करायचा नाही आणि इतर पेसर्सवर आक्रमण करून दडपण आणणे हे धोरण त्यांनी ठेवले होते.
उपाहारानंतरच्या सत्रात पावसाचा व्यत्यय आल्यानंतर खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने बिनबाद 181 धावांची मजल मारली होती. डकेट शतक पूर्ण करीत 105 व क्रॉली 59 धावांवर यावेळी खेळत होते. 98 धावांवर असताना डकेटचा एक झेल यशस्वी जैस्वालने सोडला, त्याचा लाभ घेत त्याने शतक पूर्ण केले. नंतर क्रॉलेलाही बुमराहकडूनही जीवदान मिळाले. स्वत:च्याच गोलंदाजीवर तो त्याचा झेल टिपू शकला नाही.
पावसाच्या ब्रेकनंतर भारतीय गोलंदाजांना यश बऱ्यापैकी यश मिळाले. 58.3 षटकांच्या खेळानंतर पावसास पुन्हा सुरुवात झाल्याने खेळ थांबवण्यात आला आणि चहापानाचा ब्रेक घेण्यात आला. डकेटने 170 चेंडूत 149 धावा फटकावताना 21 चौकार, एक षटकार मारला. क्रॉलेसमवेत त्याने 188 धावांची भक्कम सलामी देत संघाला मजबूत स्थितीत आणले. पावसाच्या ब्रेकनंतर प्रसिध कृष्णाने भारताला पहिले यश मिळवून देताना क्रॉलेला 65 धावांवर बाद केले. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार मारले. नंतर पहिल्या डावातील शतकवीर ओली पोपला त्याने एका इनस्विंगरवर त्रिफळाचीत केले. लेंग्थमध्ये बदल केल्यानंतर त्याला हे यश मिळाले.
डकेटला शार्दुल ठाकुरने बाद केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर ब्रुकलाही बाद केले. यावेळी इंग्लंडची स्थिती 4 बाद 253 होती. चहापानास खेळ थांबवण्यात आला तेव्हा 58.3 षटकांत 4 बाद 269 धावा जमविल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक : भारत प.डाव 471, इंग्लंड प.डाव 465, भारत दुसरा डाव 364, इंग्लंड दुसरा डाव 82 षटकांत 5 बाद 373 : क्रॉले 65, डकेट 149, पोप 8, रूट नाबाद 53 14, ब्रुक 0, स्टोक्स 33, जेमी स्मिथ नाबाद 44, अवांतर 21, प्रसिध कृष्णा 2-92, ठाकुर 2-51, जडेजा 1-104.