इंग्लंडचा भारतावर 26 धावांनी विजय
लिव्हिंगस्टोनची खेळी ठरली निर्णायक, डकेटचे अर्धशतक,
वृत्तसंस्था/ राजकोट
मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने भारतावर 26 धावांनी विजय मिळवित या मालिकेत आपले विजयाचे खाते उघडले. बेन डकेटचे अर्धशतक तसेच लिव्हिंगस्टोन आणि बटलर यांच्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने यजमान भारताला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले. इंग्लंडने 20 षटकात 9 बाद 171 धावा जमविल्या. त्यानंतर भारताने 20 षटकात 9 बाद 146 धावा जमविल्या. भारताच्या वरुण चक्रवर्तीने 24 धावांत 5 गडी बाद करण्याची कामगिरी निष्फळ ठरली. इंग्लंडतर्फे ओव्हरटन तसेच आर्चर आणि कार्से यांनी प्रभावी गोलंदाजी केली. या मालिकेतील चौथ सामना पुणे येथे 31 जानेवारीला खेळविला जाणार आहे. भारताने या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.
पाच सामन्यांच्या या मालिकेत भारताने पहिले दोन सामने जिंकून इंग्लंडवर आघाडी मिळवली आहे. या तिसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडच्या डावातील दुसऱ्या षटकात तिसऱ्या चेंडूवर हार्दिक पंड्याने सॉल्टला 5 धावांवर झेलबाद केले. कर्णधार बटलर आणि डकेट यांनी धावांचा वेग वाढविताना दुसऱ्या गड्यासाठी 8.3 षटकात 76 धावांची भागिदारी केली. वरुण चक्रवर्तीने कर्णधार बटलरला झेलबाद केले. त्याने 22 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 24 धावा जमविल्या. डकेटने 28 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 51 धावा झळकाविल्या. अक्षर पटेलने त्याला शर्माकरवी झेलबाद केले. डकेटने 26 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर लिव्हिंगस्टोनच्या समयोचित फलंदाजीमुळे इंग्लंडला 171 धावांपर्यंत मजल मारता आली. ब्रुक, स्मिथ, ओव्हरटन, कार्से, आर्चर हे लवकर बाद झाले. लिव्हिंगस्टोनने 24 चेंडूत 5 षटकार आणि 1 चौकारासह 43 धावा जमवित तो नवव्या गड्याच्या रुपात बाद झाला. आदिल रशिदने 1 चौकारासह नाबाद 10 तर वूडने नाबाद 10 धावा केल्या. इंग्लंडच्या डावामध्ये 9 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे वरुण चक्रवर्तीने 24 धावांत 5 तर हार्दिक पंड्याने 33 धावांत 2 तसेच बिश्नोई आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मोहम्मद शमीची गोलंदाजी प्रभावी ठरली नाही.
या सामन्यात अर्शदीपच्या जागी शमीला संधी देण्यात आली. 2023 च्या नोव्हेंबर महिन्यात भारतात झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यांनतर शमीचे येथे पुनरागमन झाले होते. शमीने राजकोटच्या सामन्यात पहिल्या 2 षटकात 15 धावा तर तिसऱ्या षटकात 11 धावा दिल्या. इंग्लंडने पॉवर प्ले दरम्यानच्या 6 षटकात 52 धावा जमविताना 1 गडी गमविला. इंग्लंडचे अर्धशतक 31 चेंडूत तर शतक 70 चेंडूत आणि दीडशतक 106 चेंडूत नोंदविले गेले. 10 षटकाअखेर इंग्लंडने 3 बाद 87 धावा जमविल्या होत्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावाला डळमळीत सुरुवात झाली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी 14 चेंडूत 16 धावा जमविल्या. तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर आर्चरने सॅमसनला रशिदकरवी झेलबाद केले. त्याने 3 धावा जमविल्या. भारताचा दुसरा फलंदाज चौथ्या षटकात बाद झाला. या षटकातील चौथ्या चेंडूवर कार्सेने अभिषेक शर्माला आर्चरकडे झेल देण्यास भाग पाडले. कार्सेच्या या चेंडूवर शर्मा उत्तुंग षटकार मारण्याच्या नादात झेलबाद झाला. त्याने 14 चेंडूत 5 चौकारांसह 24 धावा जमविल्या. कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा यावेळी सलग तिसऱ्या सामन्यात अधिक धावा जमवू शकला नाही. मार्क वूडने त्याला झेलबाद केले. यादवने 7 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 14 धावा जमविल्या. तिलक वर्मा रशिदच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 1 षटकार आणि 1 चौकारासह 18 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर केवळ 6 धावा जमवित तंबूत परतला. भारताची यावेळी स्थिती 12.1 षटकात 5 बाद 85 अशी होती. अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या यांनी सहाव्या गड्यासाठी 38 धावांची भर घातली. आर्चरने अक्षर पटेलला बाद केले. त्याने 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. हार्दिक पांड्या ओव्हरटनच्या गोलंदाजीवर बटलरकरवी झेलबाद झाला. त्याने 35 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 40 धावा जमविल्या. मोहम्मद शमी केवळ 6 धावांवर बाद झाला. भारताने 20 षटकात 9 बाद 146 धावांपर्यंत मजल मारल्याने इंग्लंडने हा सामना 26 धावांनी जिंकला.
भारताच्या डावामध्ये 5 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. भारताला 12 अवांतर धावा मिळाल्या. पॉवरप्ले दरम्यान भारताने 6 षटकात 51 धावा जमविताना 3 गडी गमाविले. भारताचे अर्धशतक 32 चेंडूत तर शतक 90 चेंडूत नोंदविले गेले. 10 षटकाअखेर भारताने 4 बाद 78 धावा जमविल्या होत्या. इंग्लंडतर्फे ओव्हरटनने 23 धावांत 3 तर आर्चर आणि कार्से यांनी प्रत्येकी 2, वूड व आदिल रशिद यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक - 20 षटकात 9 बाद 171 (डकेट 51, बटलर 24, लिव्हिंगस्टोन 43, रशिद नाबाद 10, वूड नाबाद 10, अवांतर 11, वरुण चक्रवर्ती 5-24, हार्दिक पांड्या 2-33, बिस्नॉई व अक्षर पटेल प्रत्येकी 1 बळी), भारत 20 षटकात 9 बाद 146 (हार्दिक पांड्या 40, अभिषेक शर्मा 24, सूर्यकुमार यादव 14, तिलक वर्मा 18, अक्षर पटेल 15, अवांतर 12, ओव्हरटन 3-23, आर्चर 2-33, कार्से 2-29, वूड व रशिद प्रत्येकी 1 बळी).
चक्रवर्तीची कामगिरी निष्फळ