अमेरिकेला हरवून इंग्लंड उपांत्य फेरीत
ख्रिस जॉर्डनची हॅट्ट्रीक, बटलरची तुफान फटकेबाजी, सामनावीर रशिदचे 2 बळी
वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन
वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनची शानदार हॅट्ट्रीक तसेच कर्णधार जोस बटलरच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर येथे रविवारी खेळविण्यात आलेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सुपर-8 फेरीतील सामन्यात इंग्लंडने अमेरिकेचा 10.2 षटके बाकी ठेऊन 10 गड्यांनी दणदणीत पराभव करून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. सॉल्ट आणि बटलर यांनी 58 चेंडूत 117 धावांची अभेद्य शतकी भागिदारी केली. 13 धावांत 2 बळी मिळविणाऱ्या आदिल रशिदला सामनावीरचा बहुमान मिळाला.
अमेरिकेला प्रथम फलंदाजी दिल्यावर इंग्लंडने अमेरिकेला 115 धावांत गुंडाळले. ख्रिस जॉर्डनने 17 चेंडूत 10 धावांच्या मोबदल्यात हॅट्ट्रीकसह 4 गडी बाद केले. या स्पर्धेतील ही तिसरी हॅट्ट्रिक आहे. त्यानंतर इंग्लंडने 9.4 षटकात बिनबाद 117 धावा झोडपत अमेरिकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. सुपर-8 फेरीतील इंग्लंडचा हा दुसरा विजय आहे. त्यांनी या फेरीत 3 पैकी 2 सामने जिंकले असून एक सामना गमविला आहे. द.आफ्रिकेइतकेच त्यांचेही 4 गुण झाले आहेत. पण सरस धावगतीमुळे इंग्लंडला पहिले स्थान मिळाले.
सॉल्ट आणि कर्णधार बटलर यांनी अमेरिकेच्या गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेतला. कर्णधार बटलरने डावातील नवव्या षटकात हरमीतसिंगला 5 षटकार खेचले. इंग्लंडने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात 60 धावा झोडपल्या. इंग्लंडचे अर्धशतक 32 चेंडूत तर शतक 54 चेंडूत फलकावर लागले. बटलरचे अर्धशतक 5 चौकार आणि 3 षटकारांसह 32 चेंडूत नोंदविले गेले. बटलर आणि सॉल्ट यांनी शतकी भागिदारी 54 चेंडूत केली. हरमीतसिंगच्या दुसऱ्या षटकामध्ये बटलरने 5 उत्तुंग षटकार ठोकत एकूण 32 धावा वसूल केल्या. बटलरने 38 चेंडूत 7 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 83 तर सॉल्टने 21 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 25 धावा जमविल्या.
सुपर-8 फेरीतील इंग्लंडचा हा तिसरा आणि शेवटचा सामना होता. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून अमेरिकेला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर अमेरिकेच्या नवोदीत फलंदाजांना फटकेबाजी करता आली नाही. नितीशकुमारने 24 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 30 तर कोरी अँडरसनने 28 चेंडूत 1 षटकारासह 29 तसेच हरमीतसिंगने 17 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 21 तसेच सलामीच्या स्टिव्हन टेलरने 13 चेंडूत 2 चौकारांसह 12 धावा जमविल्या. अमेरिकेने पॉवरप्लेच्या 6 षटकात 48 धावा जमविताना 2 गडी गमाविले. अमेरिकेचे अर्धशतक 39 चेंडूत तर शतक 99 चेंडूत फलकावर लागले. अमेरिकेच्या डावात 5 षटकार आणि 7 चौकार नोंदविले गेले. अमेरिकेच्या डावामध्ये 14 व्या षटकात सॅम करनने सर्वाधिक म्हणजे 14 धावा दिल्या. अमेरिकेच्या हरमीतसिंगने या षटकात 1 षटकार आणि 1 चौकार ठोकला.
जॉर्डनची हॅट्ट्रीक
इंग्लंड संघात मार्क वूडच्या जागी पुनरागमन करणाऱ्या वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर डावातील 19 व्या षटकात 5 चेंडूत हॅट्ट्रीकसह 4 गडी बाद केले. बार्बाडोसमध्ये जन्मलेल्या 35 वर्षीय जॉर्डनने 19 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर कोरी अँडरसनला ब्रुककरवी झेलबाद केले. त्यानंतर त्याने तिसऱ्या चेंडूवर अली खानला खाते उघडण्यापूर्वी त्रिफळाचीत केले. चौथ्या चेंडूवर त्याने केनजीला पायचीत केले तर पाचव्या चेंडूवर त्याने सौरभ नेत्रावळकरचा त्रिफळा उडविला. जॉर्डनने 2.5 षटकात 10 धावांच्या मोबदल्यात 4 गडी बाद केले. सॅम करनने 23 धावांत 2, आदिल रशिदने 13 धावांत 2, टॉप्लेने 29 धावांत 1 तर लिव्हिंगस्टोनने 24 धावांत 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक - अमेरिका 18.5 षटकात सर्व बाद 115 (नितीशकुमार 30, अँडरसन 29, हरमीतसिंग 21, टेलर 12, जोन्स 10, ख्रिस जॉर्डन 4-10, सॅम करन 2-23, आदील रशिद 2-13, टॉप्ले 1-29, लिव्हिंगस्टोन 1-24), इंग्लंड 9.4 षटकात बिनबाद 117 (सॉल्ट 21 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 25, बटलर 38 चेंडूत 7 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 83, अवांतर 9).