शहरी-ग्रामीण भेदभाव नको, सरसकट शिष्यवृत्ती द्या
अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी
सारथीचे सहव्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन
कोल्हापूर
मोडीलिपी प्रशिक्षणार्थींमध्ये शहर-ग्रामीण असा भेदभाव न करत सरसकट प्रशिक्षणार्थींना शिष्यवृत्ती द्या, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे करण्यात आली. मागणीचे निवेदन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सारथी संस्थेच्या सहव्यवस्थापकीय संचालक यांना दिले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष अवधुत पाटील उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, मराठा, मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना पाठबळ देण्यासाठी सारथी संस्थेच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात आहेत. यातंर्गत सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडीलिपी प्रशिक्षण प्रकल्प या वर्षीपासुन सुरु केला आहे. या योजनेतंर्गत अनेक विद्यार्थी मोडीलिपीचे प्रशिक्षण घेत आहेत. प्रशिक्षणासाठी सारथीकडुन आर्थिक निकषावर शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. मात्र या शिष्यवृत्तीसाठी शहरी भागातील प्रशिक्षणांर्थींना पात्र धरले जात नाही आहे. केवळ ग्रामीण भागातील प्रशिक्षणार्थींनाच हि शिष्यवृत्ती दिली जात आहे. वास्तविक शिवाजी विद्यापीठापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर ग्रामीण भाग असून शहरासह उपनगरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना हे अंतर ग्रामीण भागापेक्षा अधिक लांब आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती दिली जात असताना यामध्ये शहरी व ग्रामीण असे निकष न लावता आर्थिक निकषानुसार सरसकट प्रशिक्षणार्थींना शिष्यवृत्ती द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.