उपोषण समाप्त करा : ममता बॅनर्जी
डॉक्टरांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन : राजकारण बाजूला ठेवत कामावर परत या
वृत्तसंस्था/ कोलकाता
कोलकात्यातील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि तिच्या हत्येप्रकरणी उपोषण करत असलेल्या डॉक्टरांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उपोषण समाप्त करण्याचे आवाहन केले आहे. डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत असे त्यांनी सांगितले आहे. तर आरोग्य सचिवाला हटविण्याची मागणी अमान्य करण्यात आली आहे.
प्रत्येकाला विरोध करण्याचा अधिकार आहे, परंतु यामुळे आरोग्य सेवा प्रभावित होऊ नयेत. कुठल्याही विभागात प्रत्येकाला एकाचवेळी हटविणे शक्य नाही. आम्ही यापूर्वीच डीएचएस आणि डीएमईला हटविले आहे, याचमुळे राजकारण बाजूला ठेवत कामावर परत यावे असे आवाहन ममतांनी डॉक्टरांना केले आहे.
प्रशिक्षणार्थी डॉक्टरसाठी न्याय आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारांची मागणी करत ज्युनियर डॉक्टर मागील 15 दिवसांपासून उपोषण करत आहेत. आतापर्यंत 6 डॉक्टरांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 8 डॉक्टर बेमूदत उपोषण करत आहेत. राज्य सरकारने 21 ऑक्टोबरपर्यंत ठोस पावले उचलावीत अशी डॉक्टरांची मागणी आहे.
आज होणार मुख्यमंत्र्यांशी भेट
मुख्य सचिव मनोज पंत यांनी डॉक्टरांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटण्यासाठी राज्य सचिवालयात सोमवारी येण्याची सूचना केली आहे. तसेच त्यांनी डॉक्टरांना उपोषण समाप्त करण्याचे आवाहन पेले आहे. तर डॉक्टरांनी सर्व मागण्या पूर्ण होत नाही तोवर उपोषण समाप्त करण्यास नकार दिला आहे. परंतु बैठकीत सामील होण्यास सहमती दर्शविली आहे.
मला दीदी समजा
डॉक्टरांनी स्वत:ची जबाबदारी ओळखावी, या संपामुळे राज्यातील आरोग्य सेवा प्रभावित होत आहेत. लोक उपचारासाठी डॉक्टरांवर निर्भर आहेत. गरीब लोकांनी कुठे जावे? सरकारी रुग्णालयात गरीबांवरच मोफत उपचार होतात. कृपया माझे पद विसरा आणि मला स्वत:ची दीदी समजा. डॉक्टरांच्या मागण्या योग्य आहेत, परंतु त्यांनी डॉक्टरांची सेवा करावी असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.