आर्थिक, स्वातंत्र्य, समानतेमुळे जातीव्यवस्थेचा अंत
कित्तूर उत्सवाच्या समारोपात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे प्रतिपादन
बेळगाव : प्रत्येकांना आर्थिक, स्वातंत्र्य व समानता लाभली तरच जाती व्यवस्थेचा अंत होणार आहे. या व्यवस्थेविरुद्ध 12 व्या शतकात क्रांती झाली. मात्र आजतागायत जाती व्यवस्था नष्ट होऊन समता आली नाही. त्यामुळे आपले सरकार समतेच्या आधारावर कल्याणकारी योजना राबवित आहे. जात, धर्मापलीकडे देशप्रेम रुजविणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन, कित्तूर विकास प्राधिकरण, कन्नड व संस्कृती खात्याच्या संयुक्त विद्यमाने कित्तूर येथे आयोजित केलेल्या कित्तूर उत्सवाच्या समारोप कार्यक्रमात बोलताना सिद्धरामय्या पुढे म्हणाले, राणी चन्नम्माने इंग्रजांविरुद्ध लढा देऊन विजय मिळविला. संगोळ्ळी रायण्णा व बाळप्पा हे चन्नम्मांच्या सोबत होते. आजच्या पिढीमध्ये देशप्रेम रुजविण्यासाठी त्यांचा संघर्ष प्रेरणादायी आहे.
जात, धर्म बाजूला ठेवून परस्परांवर प्रेम भावनेने वागतानाच प्रत्येकाने देशप्रेम रुजवावे. कित्तूरचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कित्तूर उत्सव साजरा केला जात आहे. यंदा 200 वा विजयोत्सव असल्यामुळे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या मागणीवरून सरकारने जादा अनुदानही दिले आहे. अनेकांच्या त्याग, बलिदानामुळे मिळालेले स्वातंत्र्य टिकवून ठेवून समतेच्या आधारावर समाजाची निर्मिती करतानाच महात्मा बसवेश्वरांच्या शिकवणीनुसार जातीव्यवस्था व अंधश्रद्धेला फाटा देण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आमदार बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारोप समारंभात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.