एका युगाचा अंत : क्रिकेट जगताची मानवंदना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विराट कोहलीची कसोटीतून निवृत्ती ही ‘एका युगाचा अंत आणि एका महाकाय कारकिर्दीची समाप्ती’ आहे, अशी प्रतिक्रिया क्रिकेट जगतातून सोमवारी व्यक्त झाली. आधुनिक काळातील या महान भारतीय खेळाडूचे भरभरून कौतुक सर्वांकडून झालेले आहे.
‘कसोटी क्रिकेटमधील एका युगाचा अंत झाला आहे, पण वारसा कायम राहील. टीम इंडियासाठी त्याने दिलेले योगदान कायमचे जपले जाईल’, असे बीसीसीआयने ’एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने म्हटले आहे की, त्याला कोहलीची उणीव जाणवत राहील. ‘भारताच्या कसोटी क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एकाने दीर्घ स्वरुपाचा निरोप घेतला आहे. मात्र त्याने अतुलनीय वारसा मागे ठेवला आहे’, असे आयसीसीने म्हटले आहे.
उत्कृष्ट कसोटी कारकिर्दीबद्दल अभिनंदन. टी-20 क्रिकेटच्या उदयादरम्यान क्रिकेटच्या शुद्ध स्वरूपाचे नेतृत्व केल्याबद्दल आणि शिस्त, तंदुऊस्ती आणि वचनबद्धतेचे असाधारण उदाहरण मांडल्याबद्दल धन्यवाद. लॉर्ड्सवरील तुझ्या भाषणाने सर्व काही स्पष्ट केलेले आहे. तू मनापासून, धैर्याने आणि अभिमानाने कसोटी खेळलास’, असे आयसीसी प्रमुख जय शाह यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

कोहलीचा आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने (आरसीबी) म्हटले आहे की, ते चालणे, ते फटके, ते भाव आणि तो आनंदोत्सव या सर्वांची उणीव भासेल. विराटच्या दृढनिश्चयाने आणि कौशल्याने मला नेहमीच प्रेरणा दिली. तो म्हणजे खरी आख्यायिका आहे, असे ट्विट दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू ए. बी. डिव्हिलियर्सने केले आहे. कोहलीचा माजी संघ सहकारी अजिंक्य रहाणेने इंस्टाग्रामवर ‘त्याच्यासोबत मैदानात वावरणे हा एक खास प्रवास होता’, असे नमूद केले आहे.
कोहलीच्या नेतृत्वाखाली कसोटीत पदार्पण केलेला भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने म्हटले आहे की, तुझ्या नेतृत्वाखाली कसोटीत पदार्पण करण्यापासून ते देशासाठी एकत्रितपणे नवीन उंची गाठण्यापर्यंत तुझा उत्साह आणि ऊर्जा आम्हाला आठत राहील.