मतभेद संपवा, कार्य पुढे न्या
मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री राणेंना आदेश : पुन्हा शीतयुद्ध केले तर दिल्लीत बोलावण्याचे संकेत
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे या दोघांनाही मतभेद संपवून सरकारचे पक्षाचे काम पुढे नेण्याचे आदेश भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. त्यामुळे तूर्त तरी त्या दोघांमधील वादावर पडदा पडला असून श्रेष्ठींची शिष्टाई यशस्वी झाल्याचे भाजप सूत्रांनी नमूद केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय रसायनमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासमवेत प्रमोद सावंत आणि राणे यांची बैठक झाली. दोघांनाही दिल्लीत बोलावून घेण्यात आले होते. दोघांमध्ये काही विषयांवऊन वाद सुरू असल्याचे श्रेष्ठींच्या कानावर गेल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले होते. नेतृत्व बदल किंवा मंत्रिमंडळ फेररचना झाल्यास त्याचे उलटे परिणाम होण्याची शक्यता असल्याने त्याबाबत श्रेष्ठींनी कोणताही निर्णय घेण्यास स्वारस्य दाखवले नाही. उलट दोघांनी सबुरीने घ्यावे, वाद मिटवावेत नाहीतर त्याचे परिणाम दोघांसह पक्षालाही भोगावे लागतील असे स्पष्टपणे दोघांनाही श्रेष्ठींनी बजावल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांची बरीच कानउघाडणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोघांकडूनही भाष्य करण्यास टाळाटाळ
दोन्ही नेत्यांनी श्रेष्ठींसमोर आपापले म्हणणे मांडले आणि श्रेष्ठींनी ते ऐकून घेतले. सध्या गोव्यातील ज्वलंत विषयावर थोडक्यात चर्चा करण्यात आली आणि भाजप सरकारचे नाव खराब कऊ नका असे सांगून दोघांनाही श्रेष्ठींनी माघारी पाठविले आहे. दोन्ही नेत्यांनी गोव्यात आल्यानंतर ‘अळी मिळी गुप चिळी’ असे धोरण ठेवले असून त्यावर जास्त काही भाष्य केलेले नाही. भाजप सरकारमधील मतभेद सार्वजनिक कऊ नका, असा सल्लाही त्या दोघांना पक्षश्रेष्ठींनी दिला आहे.
राणेंना तोंड आवरण्याचा सल्ला
पक्षश्रेष्ठींसोबतच्या बैठकीत डॉ. सावंत यांनी आपली खुर्ची टिकवण्यात यश मिळवले असून राणे यांना तोंड आवरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच पक्षशिस्त सांभाळा असेही त्यांना बजावण्यात आले आहे. दोघांच्या शीतयुद्धाला पक्षश्रेष्ठींनी आता लगाम घातला असून दोघांच्या कामगिरीवर पक्षश्रेष्ठी नजर ठेवणार असल्याची सूचना दोघांनाही देण्यात आली आहे. पुन्हा शीतयुद्ध कराल तर परत दिल्लीत बोलावले जाईल, असा इशाराही त्यांना देण्यात आल्याचे सूत्रांनी नमूद केले. पक्षश्रेष्ठींनी दोघांची स्वतंत्रपणे बैठक घेतली तेव्हा दोघांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्याचे कळते. अशा तक्रारी पुन्हा कऊ नका, एकमेकांना विश्वासात घेऊन काम करा, असे धडे दोघांनाही देण्यात आले आहेत. आता येथून पुढे दोन्ही नेते कसे काय वाटचाल करतात यावर पक्षश्रेष्ठी लक्ष ठेवणार आहेत. सध्या जे मंत्रिमंडळ कार्यरत आहे तेच पुढे चालू ठेवा. पुनर्रचनेचे नंतर बघू असा सल्ला दोघानांही देण्यात आला आहे.