शेतकरी मंडईतील व्यापाऱ्यांचे अतिक्रमण हटवले
सातारा :
साताऱ्यात रविवार पेठेत भाजी मंडईत शेतकऱ्यांच्या जागेत इतर कोणीही बसू लागल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री करता येईना, त्याबाबतची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे केली होती. शेतकऱ्यांची जागा खुली करुन देण्याची विनंती केली होती. त्यानुसार सातारा पालिकेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्यासह पथक, पोलीस कर्मचारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी गेले. दरम्यान, त्याचवेळी राठोड नामक भाईने चक्क स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना गोळ्या घालण्याची धमकी दिली. पोलिसांच्या समक्षच हा प्रकार घडल्याने वातावरण तणावाचे झाले होते. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला.
सातारा शहरात रविवार पेठेतल्या भाजी मंडईत शेतकऱ्यांकरता दोन रांगा या आरक्षित ठेवल्या आहेत. त्या रांगामध्ये शेतकरीच फक्त भाजीपाला विक्री करु शकतात. मात्र, अलिकडच्या काही दिवसांमध्ये मंडईला काही भाइं&चे ग्रहण लागले आहे. मंडईत मंथली घेवून चक्क काही परप्रांतिय, काही बाहेरच्या जिह्यातील व्यापाऱ्यांना बसवले जाते. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना व्यवसाय करता येत नाही. त्यातच भाईचा त्रास. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मंडईतील अतिक्रमणे हटवण्यात यावे, शेतकऱ्यांची जागा खुली करावी अशी वारंवार मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सातारा पालिकेकडे केली होती.
पालिकेच्यावतीने अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकाकडून पोलीस बंदोबस्तात कारवाई करतेवेळी एक राठोड नामक भाई हा तेथे आला. त्याने चक्क पोलिसांच्यासमोरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळ्या घालीन, कापीन अशी भाषा केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.
दरम्यान, अतिक्रमण हटाव विभागाचे अधिकारी प्रशांत निकम आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला. मात्र, अशा प्रकारे दादागिरी होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला.
- भाईंना गोण्या उचलायला लावायला हव्यात
कोणाला तरी टपरी टाकायला लावून त्यांच्याकडून महिन्याकाठी कोणतेही श्रम न करता पैसे घेवून हपापा माल कमावणाऱ्यांना तथाकथित भाई मंडळींनी जरा त्याच भाजी मंडईत येणाऱ्या गोण्या उचलल्या तरी कष्टाचे पैसे मिळतील, शेतकऱ्यांशी भांडण करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या शेतावर जावून तो भाजीपाला कशा पिकवला जातो त्याकरता एक दिवस शेतात राबा म्हणजे समजेल, कष्ट करा रे भाई मंडळींनो अशीही चर्चा त्याच भाजी मंडईत सुरु होती.
- तथाकथित भाईंमुळे वाहतुकीची कोंडी
प्राथमिक शिक्षक बँक ते भाजी मंडई शेजारील पेट्रोल पंप या रस्त्यावर तथाकथित भाईंच्या हप्तेगिरीमुळे अनेक टपऱ्या, दुकाने थाटली बेकायदा थाटली गेली आहेत. याची कल्पना नगरपालिकेलासुद्धा आहे. तसेच याच मार्गावर अनेक व्यापारी भाजी विक्रेते रस्त्यावरच माल विकत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे ना पालिका, ना वाहतुक शाखा यांच्यावर कोणीही कारवाई करत नाही. त्यांना तथाकथित भाईंचे अभय मिळत आहे.