बाजारपेठेत पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र
महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथक-रहदारी पोलिसांकडून दरबार गल्लीतील अतिक्रमण हटविले : दुकानांबाहेरील साहित्य जप्त
बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून थंडावलेली बाजारपेठ व शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम सोमवारपासून पुन्हा एकदा तीव्र करण्यात आली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथक व रहदारी पोलिसांकडून सोमवारी सायंकाळी दरबार गल्लीतील अतिक्रमण हटविण्यात आले. दुकानाबाहेर थाटण्यात आलेले साहित्य व फलक जप्त करून नेण्यात आले. अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा सुरू झाल्याने बाजारपेठेला शिस्त लागण्यास मदत होणार आहे. गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, पांगुळ गल्ली, भेंडीबाजार, टेंगिनकेरा गल्ली, समादेवी गल्ली, रामदेव गल्ली, काकतीवेस, किर्लोस्कर रोड, रविवारपेठ यासह शहापूर, वडगाव परिसरातील गल्ल्यांना शिस्त लावण्यासाठी गेल्या वर्षभरापासून रहदारी पोलीस आणि महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाकडून प्रयत्न सुरू आहेत. अनेकवेळा अतिक्रमणकर्त्यांना सूचना करूनदेखील त्यांच्याकडून पुन्हा अतिक्रमण केले जात असल्याचे दिसून येत आहे. बऱ्याचवेळा साहित्य जप्त करून नेण्यात आले आहे. दिवाळीनिमित्त ही कारवाई काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली होती. पण आता पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे.
सदर मोहीम यापुढेही सुरू राहणार
सोमवारी दरबार गल्लीत रहदारी विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त जोतिबा निकम यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. दुकानदारांना, तसेच रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या व्यावसायिकांना सूचना करण्यासह अतिक्रमित साहित्य जप्त करण्यात आले. सदर मोहीम यापुढे पुन्हा सुरू राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.