समादेवी, गणपत गल्लीत अतिक्रमण हटाव मोहीम
बेळगाव : शहर व उपनगरासह विशेषकरून बाजारपेठेला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांपासून कंबर कसली आहे. सातत्याने अतिक्रमण विरोधी मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात रस्त्यांवरील अतिक्रमण कमी होण्यासह वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागण्यास मदत झाली आहे. या कारवाईला महापालिकेचीही तितकीच साथ मिळत आहे. सोमवारी समादेवी, गणपत गल्लीत अतिक्रमण हटविले. शहरात जिकडेतिकडे अतिक्रमण करून व्यवसाय केले जात आहेत. काही दुकानदारांनी गटारीबाहेर व्यवसाय थाटले आहेत. बैठे विक्रेते व फेरीवाले रस्त्याच्या कडेला मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्याबाहेर येऊन व्यवसाय करत आहेत. त्यामुळे शहरातील विशेषकरून बाजारपेठेतील रस्ते निमुळते बनले आहेत.
यापूर्वी गणपत गल्ली, खडेबाजार, पांगुळ गल्ली, कांदा मार्केट, रविवार पेठ, रामलिंगखिंड गल्ली, समादेवी गल्ली, नार्वेकर गल्ली, काकतीवेस, किर्लोस्कर रोड आदी ठिकाणी वाहनावरून जाणे तर दूरच, चालत जाणेही कठीण झाले होते. त्यामुळे ही बाब लक्षात घेत वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त जोतिबा निकम यांनी गेल्या सहा महिन्यांपासून दक्षिण व उत्तर विभागात महापालिकेच्या सहकार्याने अतिक्रमण हटविण्यास प्राधान्य दिले आहे. सातत्याने अतिक्रमण विरोधी मोहीम राबविली जात असल्याने बाजारपेठेने काही प्रमाणात मोकळा श्वास घेतला असल्याचे दिसून येत आहे. वारंवार सूचना करूनही काही व्यापारी पुन्हा अतिक्रमण करत असल्याचे दिसून आल्यास सदर साहित्य जप्त करण्याचा इशारा दिला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असल्याने सोमवारी पुन्हा वाहतूक पोलीस आणि महापालिकेने समादेवी गल्ली आणि गणपत गल्लीत अतिक्रमण हटविले.