शिक्षकांप्रमाणे प्रोत्साहन द्या
अंगणवाडी सेविकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : जिल्ह्यातील सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षणासाठी सुरुवातीला शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. यानंतर त्यांना वेतनासह सर्वेक्षण प्रोत्साहन धन रजेनंतरही देण्यात आले. शेवटच्याक्षणी अंगणवाडी सेविकांना सर्वेक्षणाचे काम करण्यास सांगितले. यानंतर अंगणवाडी सेविकांनी सर्वेक्षणाचे काम योग्यरित्या पूर्ण केले. यामुळे शिक्षकांप्रमाणे आम्हालाही प्रोत्साहन देण्यात यावे, अशी मागणी एआयटीयूसी सलग्न असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस संघटनेच्यावतीने करण्यात आली. राज्य सरकारने राज्य भरात सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षणाचे काम हाती घेतले. हे सर्वेक्षण ऐन दसऱ्याच्या सुटीत पूर्ण करण्याचे ध्येय बाळगण्यात आले होते. यासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. शिक्षकांनी जवळजवळ सर्वेक्षणाचे काम संपविले होते. मात्र शिक्षकांना यातून सुटका देत त्यांना रजा देण्यात आली. यासाठी त्यांना वेतनासह सर्वेक्षण प्रोत्साहन धनही देण्यात आले. सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी शेवटच्याक्षणी सर्वेक्षणासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेण्यात आली. अंगणवाडी सेविकांनीही योग्यरित्या व नियोजित वेळेत सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले. त्यामुळे शिक्षकांप्रमाणेच आपल्यालाही प्रोत्साहन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.