अमली पदार्थ तस्करांशी उत्तर प्रदेशमध्ये चकमक
50,000 रुपये बक्षीस असलेल्या तस्कराला साथीदारासह अटक
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये रविवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत पोलिसांनी 50,000 रुपयांचे बक्षीस असलेल्या तस्कराला अटक केली. त्याच्या पायात गोळी लागली असून त्याच्यावर सध्या इस्पितळात उपचार सुरू आहेत. अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी त्याच्या अन्य एका साथीदारालाही अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या गुन्हेगारांची ओळख पटली आहे. पंकज त्रिपाठी हा कौशाम्बी जिह्यातील अकबरपूर येथील रहिवासी आहे, तर नरेंद्र त्रिपाठी हा रायबरेली जिह्यातील गडगंज येथील रहिवासी आहे. त्यांच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्तूल, काडतुसे, एक मोटारसायकल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
मोहनलालगंज पोलीस स्थानक परिसरातील जबरुली गावाजवळ रविवारी रात्री पोलिसांशी तस्करांशी चकमक झाली, असे एएनटीएफचे उपनिरीक्षक मनीष कुमार यांनी सांगितले. अटक केलेल्यांपैकी पंकज हा एक कुख्यात गुन्हेगार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तो ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणात अनेक दिवसांपासून फरार होता. त्याच्या डोक्यावर 50,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. अमली पदार्थ विरोधी कार्यदल आणि गुन्हेगारांमध्ये झालेल्या चकमकीची माहिती मिळताच एडीसीपी दक्षिण आणि एसीपी यांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.