लोकांसाठी सुसह्या असे नियम करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांच्या मंत्र्यांना संदेश
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सर्वसामान्य नागरीकांना सुसह्या आणि सोपे वाटतील, असे नियम करण्यात आले पाहिजेत, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना दिला आहे. लोकांना त्यांच्या कामांसाठी फालतू पेपरवर्क करावे लागू नये. चाळीस-चाळीस पानी फॉर्मस् भरावे लागू नयेत, अशी व्यवस्था आपल्या देशात असावयास हवी, असे प्रतिपादन त्यांनी संसदेच्या वाचनालय वास्तूत झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या सांसदीय दलाच्या बैठकीत मंगळवारी केले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मिळविलेल्या प्रचंड विजयासाठी या बैठकीत प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यात आले. हार घालून त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी उपस्थित संसद सदस्यांना संबोधित केले. प्रशासकीय सुधारणांसंबंधी त्यांनी त्यांचे महत्वपूर्ण विचार व्यक्त केले. तसेच त्यांनी 10 व्या वेळी मुख्यमंत्री बनलेले संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांचे अभिनंदनही केले. त्यानंतर त्यांनी बैठकीत भाषण केले.
सुलभता निर्माण करा
केंद्र सरकारच्या प्रत्येक विभागात शिस्त असणे आवश्यक आहे. मात्र, लोकांना त्रासदायक ठरतील असे नियम असू नयेत. प्रत्येक विभागाला त्याच्या योजना आणि प्रकल्प यशस्वी होण्यासाठी जनतेच्या सहकार्याची आवश्यकता असते. त्यामुळे नियम आणि प्रक्रिया सोप्या आणि सुलभ बनविल्यास जनतेचे सहकार्य अधिक प्रमाणात मिळण्याची शक्यता असते. म्हणून प्रत्येक मंत्र्याने स्वत: लक्ष घालून नियम आणि प्रक्रिया जास्तीत जास्त सुलभ आणि सरळ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लोकांना असुविधा होता कामा नये. व्यवस्थेला ठीक करण्यासाठी लोकांना त्रास देणे हे अयोग्य आहे, याची जाणीव ठेवण्यात आली पाहिजे. नियम सोपे करण्यावर भर द्यावा, अशा अनेक महत्वाच्या सूचना त्यांनी बैठकीत केल्या.
देशात ‘रिफॉर्म एक्स्पे्रस’ जोरात
भारतात सध्या प्रत्येक क्षेत्रात सुधारणा होत आहे. देशाची ‘रिफॉर्म एक्स्पे्रस’ सध्या जोरात धावत आहे. केंद्र सरकारचा ‘स्वयंप्रमाणितता’ किंवा ‘सेल्फ सर्टिफिकेशन’ हा उपक्रम सुधारणांचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हा कार्यक्रम गेली 10 वर्षे जनतेच्या सहकार्याने सुरळीत चालला आहे. या उपक्रमामुळे जनतेचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचत आहे. या उपक्रमाचा कोणी दुरुपयोग केल्याची उदाहरणे अत्यल्प आहेत. सध्या देशात प्रशासकीय सुधारणा होत असून ही प्रक्रिया स्वच्छ उद्देशाने हाती घेण्यात आली आहे. या सुधारणा नागरीकांच्या सुविधांसाठीच आहेत. त्यांना लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जीवन सुसह्याता आणि व्यवसाय सुसह्याता या दोन संकल्पनांवर सध्या केंद्र सरकारचा भर प्रामुख्याने आहे. आम्ही या ज्या सुधारणा घडवून आणत आहोत, त्या केवळ सरकारला अधिक पैसा मिळावा म्हणून नाहीत. तर त्या जनतेला अधिक सुलभता मिळावी म्हणून आहेत. लोकांचे दैनंदिन जीवन सुसह्या झाले, तरच त्यांचा प्रशासनावरचा विश्वास वाढीला लागेल, असे महत्वाचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत केले आहे.
11 डिसेंबरला स्नेह भोजन
गुरुवारी 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व संसद सदस्यांसाठी रात्रीच्या भोजनाचे विशेष आयोजन केले आहे. मित्रपक्षांसमवेत उत्तम समन्वय राखणे, संसद अधिवेशनात संयुक्त रणनीती बनविणे आणि आघाडीत ताळमेळ राखणे या तीन उद्देश्यांसाठी या भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच भोजन कार्यक्रमात केंद्र सरकारचे सांसदीय कार्यक्रम, संसद अधिवेशनातील प्राथमिकता आणि येत्या पाच महिन्यांमध्ये होऊ घातलेल्या, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विधानसभा निवडणुकांविषयीही चर्चा होणार आहे.