दरोड्यातील आरोपीचे बिहारमध्ये एन्काउंटर
सहकारी फरार : एसटीएफचे पाच जवान जखमी
वृत्तसंस्था / अररिया
बिहारमधील अररिया जिह्यात शनिवारी पहाटे एसटीएफची गुन्हेगारांशी चकमक झाली. ज्वेलर्समधील दरोडा प्रकरणातील आरोपी चुनमून झा हा एन्काउंटरमध्ये मारला गेला आहे. तर एसटीएफचे पाच जवानही जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी एसटीएफला दोन गुन्हेगारांच्या हालचालींबद्दल माहिती मिळाली. या आधारावर घटनास्थळाला घेराव घालण्यात आला. पोलिसांनी गुन्हेगारांना शरणागती पत्करण्याचे आवाहन केले. मात्र, आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न करताना गोळीबार केला. याला एसटीएफने चोख प्रत्युत्तर दिल्यामुळे एक गुन्हेगार जखमी झाला. त्याला रुग्णालयात पाठवण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दुसरा गुन्हेगार घटनास्थळावरून पळून गेला असून त्याच्या शोधात तपास पथके गुंतली आहेत.
अररियातील जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख डॉ. प्रदीप कुमार यांनी चुनमून झा याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. चुनमून झा याला सुमारे सहा ते सात गोळ्या लागल्या. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नेमकी स्थिती समजणार असल्याचे त्यांनी सांगितले. या चकमकीत नरपतगंजचे एसएचओ कुमार विकास यांच्यासह पाच जवान जखमी झाले. जखमी पोलिसांवर उपचार सुरू आहेत.
चुनमून झा वर तीन लाख रुपयांचे बक्षीस
चुनमून झा हा अनेक दरोड्याच्या घटनांचा सूत्रधार होता. तो अपहरण, खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, चोऱ्या, शस्त्रास्त्र कायदा (पूर्णिया येथील लोजपा नेते अनिल ओरांव यांची हत्या आणि पळसी येथील प्रमुख संतोष मंडल यांची हत्या करण्याचा प्रयत्न) आणि पूर्णिया तसेच आरा येथील ज्वेलर्समधील दरोडा अशा प्रकरणांमध्ये हवा होता. पूर्णियामधील ज्वेलर्स प्रकरणात त्याच्यावर 3 लाख रुपयांचे बक्षीसही होते.