बदलापूर प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर
पोलिसांचे पिस्तुल हिसकावून पोलिसांवर हल्ला
प्रतिनिधी / मुंबई
बदलापुरात घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात एन्काऊंटर केल्याने खळबळ उडाली आहे. प्रथम अक्षयने शिंदेने पोलिसांचे रिव्हॉल्व्हर हिसकावून केलेल्या गोळीबारात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय शिंदेवर गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले. अक्षयचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येताच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत.
बदलापूर घटनेच्या तपासादरम्यान अक्षय शिंदेच्या पहिल्या पत्नीने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली. त्याच्यावर या प्रकरणात पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आधी आरोपी अक्षय शिंदेने स्वत:वर गोळी झाडल्याची माहिती समोर आली. तर, त्यानंतर त्याचा एन्काऊंटर झाल्याचे समोर आले.
आरोपी अक्षय याच्यावर बदलापूरमध्ये घडलेल्या अत्याचाराशिवाय आणखी एक प्रकरण दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात अक्षयला तळोजा जेलमधून ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात होते. साधारण 6.30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे पथक मुंब्रा बायपास जवळ आले. तेव्हा आरोपीने एका पोलीस अधिकाऱ्याच्या हातातून बंदूक हिसकावून गोळीबार केला. तेव्हा एक गोळी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरे यांना लागली. यामध्ये ते जखमी झाले. यानंतर त्याने पोलीस पथकावर आणखी दोन ते तीन गोळ्या झाडल्या. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यावेळी तो यामध्ये गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला कळवा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला असून त्याचा तेव्हा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, अद्याप पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नसून तपास सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान अक्षयच्या पालकांनी पोलिसांवर आरोप केले आहेत. अक्षय हा जामिनावर सुटणार असल्यानेच त्याला मारल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी अक्षयच्या आईची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. जो मुलगा फटाका देखील फोडू शकत नाही, तो बंदूक कशी चालवू शकतो, असा सवाल त्यांनी केला आहे. सोमवारी तळोजा कारागृहात अक्षयला भेटण्यासाठी त्याचे पालक गेले होते. मात्र यावेळी आम्हाला अक्षयला चार वाजता भेटायला दिल्याचा आरोपही त्यांनी केला.
कोण होता अक्षय शिंदे?
अक्षय शिंदे याचे मूळ गाव कर्नाटकातील गुलबर्गा येथे आहे. त्याचे कुटुंब बदलापूर येथे आल्यानंतर त्याने इमारतीचा सुरक्षारक्षक म्हणून काम केले. अक्षयची तीन लग्ने झाली होती. मात्र त्याच्या विकृतपणामुळे त्याच्या पत्नी त्याला सोडून गेल्या. या सर्व प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
शाळेचे अध्यक्ष, सचिवांची हायकोर्टात धाव
बदलापूर येथील शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शाळेचे अध्यक्ष आणि सचिवांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेची न्यायमूर्ती आर. एन. लड्ढा यांच्या एकल खंडपीठाने याचिकेची सुनावणी 1 ऑक्टोबरला निश्चित केली आहे.
आदर्श विद्यामंदिर शाळेतील चार वर्षाच्या दोन चिमुरड्यांवर शाळेच्या आवारातच झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना उघड झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. मात्र गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल करून घेतली.
या प्रकरणी लैंगिक गुह्यांपासून संरक्षण कायद्याच्या तरतुदींनुसार घटनेची त्वरित पोलिसांना तक्रार न दिल्याबद्दल आणि निष्काळजीपणाबद्दल शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याने सुरूवातीला सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती आर. एन. लड्ढा यांच्या एकल खंडपीठाने याचिकेची सुनावणी 1 ऑक्टोबरला निशिचित केली.