सिनेट निवडणुकीचे मतदान झाले, आता निकालाकडे डोळे!
१० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांसाठी पार पडली प्रक्रिया; वर्चस्वासाठी युवासेना - अभाविपमध्ये चुरस; २७ सप्टेंबर रोजी लागणार निकाल
रत्नागिरी प्रतिनिधी
मुंबई विद्यापीठाच्या १० नोंदणीकृत पदवीधारकांच्या जागांसाठी २४ सप्टेंबर रोजी मतदान पार पडले. १० जागांवरील निवडणुकीसाठी एकूण २८ उमेदवार असून युवासेनाविरुद्ध अभाविप अशी जोरदार चुरस या निवडणुकीसाठी पहायला मिळणार आहे. या निवडणुकीचा येत्या २७ सप्टेंबर रोजी निकाल असून त्यात कुणाचे वर्चस्व लागणार, याकडे लक्ष वेधले आहे.
मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण ३८ मतदान केंद्रावर आणि ५४ बुथवर ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी एकूण १३,३०६ मतदार आहेत. मंगळवारी सकाळी ९ ते ५ मतदानाची वेळ होती. त्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर केंद्रनिहाय व बुथनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने या निवडणुकीसाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली होती. यापूर्वी मुंबई विद्यापीठाच्या १० जागांसाठी होणारी सिनेट निवडणूक रविवारी नियोजित होती. पण, शुक्रवारी रात्री अचानक विद्यापीठाने परिपत्रक काढत ही निवडणूक स्थगित केली. या निर्णयाला युवा सेनेकडून मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होते. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टानं विद्यापीठाने दिलेली स्थगिती रद्द केली. त्यामुळे २४ सप्टेंबर रोजी ही निवडणूक प्रकिया पार पडली.