दिव्यांगांचे सशक्तीकरण समाजाची जबाबदारी : राष्ट्रपती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी दिव्यांगांसाठी समावेशकता आणि समान संधींच्या आवश्यकतेवर जोर देत त्यांचे सशक्तीकरण समाज आणि सरकारची सामूहिक जबाबदारी असल्याचे वक्तव्य केले आहे. राष्ट्रपतींनी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात दिव्यांगांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित केले आहे. दिव्यांगांवरून दृष्टीकोन बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दिव्यांगांना दया नको, सहानुभूती हवी आहे. त्यांना खास लक्ष नव्हे तर स्वाभाविक प्रेम हवे. दिव्यांगांना समानता आणि आदर मिळेल असे जग निर्माण करण्याची गरज आहे. दिव्यांग असणे ही काही कमजोरी नव्हे तर एक विशेष परिस्थिती आहे, ज्याकरता वेगळ्या प्रकारच्या समर्थनाची गरज भासते असे मुर्मू यांनी म्हटले आहे.
दिव्यांगांच्या भागीदारीला महत्त्व द्या
दिव्यांगांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खास प्रशिक्षण, सल्ला आणि सुविधा देण्यात यावी. सरकार त्यांच्या कल्याणासाठी काम करत आहे. समाजाने देखील त्यांच्या भागीदारीला महत्त्व देण्याची गरज आहे. 2012 च्या पॅराऑलिम्पिकमध्ये भारताने केवळ एक पदक जिंकले होते, तर 2024 मध्ये दिव्यांगांबद्दल जागरुकता आणि समर्थनामुळे आमच्या खेळाडूंनी 29 पदके मिळविली आहेत. ही प्रगती आमच्या दिव्यांगांबद्दल वाढती संवेदनशीलता आणि त्यांच्या सशक्तीकरणाबद्दल आमची प्रतिबद्धता दर्शविते असे उद्गार राष्ट्रपतींनी काढले आहेत.
समान संधी सुनिश्चित व्हाव्यात
दिव्यांगांना सहजपणे वापरता येतील अशाप्रकारच्या सुविधा निर्माण केल्या जाव्यात. दिव्यांगांसाठी जीवन सुलभ करणे समाजाच्या प्रगतीचा एक महत्त्वपूर्ण निकष आहे. एका संवेदनशील समाजात सर्वांसाठी समान संधी आणि कुठल्याही अडथळ्याशिवाय तिथपर्यंत पोहोचणे सुनिश्चित केले जाते. विविध मंत्रालयं आणि विभाग एकत्र येत दिव्यांगांसाठी स्थिती सुधारू पाहत आहे. सर्वांनी एकजूट होत दिव्यांगांच्या सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरणासाठी काम करावे असे मुर्मू यांनी म्हटले आहे.