For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्प कालावधीतील प्रशिक्षणातून रोजगाराची संधी

03:08 PM May 09, 2025 IST | Radhika Patil
अल्प कालावधीतील प्रशिक्षणातून रोजगाराची संधी
Advertisement

कोल्हापूर / अहिल्या परकाळे :

Advertisement

शिवाजी विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागात 69 विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. या केंद्रांतर्गत तिन्ही जिल्ह्यातून 2 हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. विभागातील प्रशिक्षणार्थीनी स्वत:चे व्यवसाय उभारले आहेत. विद्यार्थी महिला, ज्येष्ठ नागरिक, औद्योगिक कर्मचाऱ्यांना या अभ्यासक्रमाचा चांगलाच उपयोग होत आहे. यातून एक महिना ते वर्षापर्यंतच्या कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थीचा सामाजिक, आर्थिक विकास होतो. नाममात्र प्रवेश शुल्कात व्यवसायाची, रोजगाराची संधी मिळत असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे.

आजीवन अध्ययन व विस्तार विभागात कौशल्यावर आधारीत प्रशिक्षण घेऊन अनेक तरूण तरूणांनी व्यवसाय सुरू केला आहे. मोडी लिपी आणि इंग्रजी भाषा प -भुत्वळामुळे अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. कमीत कमी खर्चात आणि कमी वेळेत जवळपास हजारो प्रशिक्षणार्थीना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांची विद्यार्थ्यांमध्ये भलतीच क्रेझ वाढत आहे. बदलत्या काळानुसार स्टार्टअपच्या युगात या लहान पण रोजगार देणाऱ्या अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे.

Advertisement

इव्हेंट मॅनेजमेंट, गार्डनिंग, चॉकलेट मेकींग, शिलाई मशिन, यासह अन्य अभ्यासक्रमांना 500 ते 1 हजारपर्यंत शुल्क आहे. या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण घेण्यासाठी वयाची अट नसून कमी खर्चात आणि कमी वेळेत प्रशिक्षण पूर्ण करता येते. त्यामुळे तरूणांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वच लोक प्रशिक्षण घेवून व्यवसायाकडे वळत आहेत. घरातल्या घरात किचन गार्डन, टेरेस गार्डन आणि बाल्कनी गार्डन तयार करून अनेक महिलांनी दररोजची कोथींबिर, कडीपत्त्यासह भाज्यांचा प्रश्न निकाली काढला आहे. तर काहींनी ब्युटी पार्लर, छोटे मोठे इव्हेंट, खाद्यपदार्थांचे स्टॉल, प्लंबिंगसारखी कामेही सुरू केली आहेत. या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण घेणाऱ्या 80 टक्के प्रशिक्षणार्थीना व्यवसाय करण्याचे प्रोत्साहन व नोकरीची संधी मिळाली आहे. त्यामुळे हळूहळू या प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांची गर्दी वाढू लागली आहे.

  • सामाजिक जबाबदारी म्हणून प्रौढांना आधार

तंत्रज्ञानाच्या युगात ईबँकींगचे महत्व वाढले आहे. ईबँकीगमध्ये ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक होवू नये म्हणून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच त्यांचा बिरंगुळा व्हावा म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याख्यान, नाडी परीक्षण, योगा थेरपी आदी उपक्रम राबवले जातात. त्यामुळे या केंद्राचा वृध्दांना चांगला लाभ होत आहे.

  • सुरू असलेले अभ्यासक्रम

बालवाडी प्रशिक्षण, ग्रंथालय व्यवस्थापन, ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद व्यक्तिमत्व विकास, इंग्रजी भाषा प्रभुत्व, मोडी लिपी, सेल्समनशिप, प्राकृत भाषा आणि जैन धर्म, फॅशन डिझायनिंग, टॅली, सुगम संगीत, हार्मोनियम, तबला, बेसिक ड्रॉइंग आणि पेंटिंग, शाहिरी कला, ब्युटी पार्लर, इव्हेंट मॅनेजमेंट, योगा, शेअर मार्केट, हिंदी अनुवाद, ड्रेस डिझायनिंग, इलेक्ट्रिकल घरगुती उपकरणांची देखभाल आणि दुरुस्ती, रेडिओ जॉकी, सुगंधित आणि औषधी वनस्पतींचा परिचय, मेहंदी, योग आणि निसर्गोपचार, रोपवाटिका व उद्यान कौशल्य, उद्योजकता आणि व्यवस्थापन, कोल्हापुरी दागिन्यांचे डिझायनिंग, हॉटेल कामगारांसाठी संवाद कौशल्य, किचन व टेरेस गार्डन, सजावटीचे साहित्य तयार करणे, एक्यूप्प्रेशर, चॅकोलेट बनवणे, क्लॉथ पेंटिंग, पॉट पेंटिंग यासह अन्य 69 विषयाचे प्रशिक्षण दिले जाते.

  • दहावी-बारावी उत्तीर्ण कोणालाही प्रवेश घेता येतो

आजीवन अध्ययन व विस्तार विभागात कमी कालावधीचे व्होकेशनल अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाते. यातून अनेक विद्यार्थ्यांनी स्वत:चा व्यवसाय केला असून काहीजण नोकरी करीत आहेत. एकाने नॅचरोपॅथी ज्युस सेंटर सुरू केले असून यामध्ये आवळा, गव्हांकुर आदींची विक्री केली जाते. जूनमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होते. प्रवेशासाठी दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र लागते.

                                                                                       डॉ. रामचंद्र पवार (संचालक, आजीवन अध्ययन व विस्तार विभागात )

Advertisement
Tags :

.