मोबाईल निर्मिती उद्योगात अडीच लाख जणांना रोजगाराची संधी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मोबाईल फोन निर्मितीच्या कार्यामध्ये पुढील बारा ते अठरा महिन्यांमध्ये मोठी तेजी राहणार असून परिणामी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या अडीच लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
देशांतर्गत निर्मिती उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अलीकडच्या काळात अनेक उपाययोजना जारी केल्या आहेत. आगामी काळात जागतिक स्तरावरील मोबाईल ग्राहकांच्या संख्येमध्ये वाढ होणार असल्यामुळे नव्याने उमेदवारांची गरज मोबाईल निर्मिती कंपन्यांना लागणार आहे. भारतामध्ये आयफोन निर्माती दिग्गज कंपनी अॅपलच्या सहकारी तीन कंपन्या फॉक्सकॉन, विस्ट्रॉनआणि पेगाट्रॉन मोबाईल फोनचे भारतामध्ये उत्पादन घेत आहेत. भारतातील डिक्सन टेक्नॉलॉजी ही कंपनी सुद्धा निर्मिती कार्याला बळकटी देण्याचा प्रयत्न करते आहे.
पीएलआय योजनेचा होतोय लाभ
गेल्या तीन वर्षाच्या काळामध्ये भारत सरकारने पीएलआय योजनेचा उद्योगांना लाभ मिळवत त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. या अवधीमध्ये या क्षेत्रात जवळपास पाच लाख जणांना रोजगार प्राप्त झाल्याची माहिती आहे. पुढील काळामध्ये मोबाईल निर्मिती कार्याच्या विस्तारामुळे नव्याने अडीच लाख जणांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत.