रोजगार हमी सक्षमीकरण अभियानाला प्रारंभ
रोहयो वाहिनी वाहनाला चालना : प्रत्येक ग्रा. पं. ला 10 ते 50 जनावरांचे गोठे उभारण्याच्या सूचना
बेळगाव : उद्योग खात्री योजनेचा विस्तार वाढविण्यासाठी रोजगार हमी व सक्षमीकरण अभियानाला प्रारंभ झाला आहे. गुरुवारी ता. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश हेडगे व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोजगार वाहिनी वाहनाला चालना दिली. शिवाय प्रत्येक ग्राम पंचायतीला 10 ते 50 जनावरांचे गोठे उभारण्याच्या सूचनाही केल्या आहेत. याबरोबर या अभियानांतर्गत गावोगावी जागृती करून रोहयो योजनेचा विस्तार वाढवावा, असेही सांगण्यात आले आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत रस्ते, तलाव, गटारी, शेततळी यासह इतर कामांना चालना दिली जात आहे. मात्र, या कामांपासून अद्याप बरेच लाभार्थी वंचित आहेत. यासाठी रोहयो सक्षमीकरण अभियान राबवून घरोघरी जागृती केली जाणार आहे. गुरुवारी रोहयो वाहिनी वाहनाला हिरवा झेंडा दाखवून चालना देण्यात आली. या वाहनाच्या माध्यमातून बेळगाव तालुक्यात सक्षमीकरण अभियान राबविले जाणार आहे.
रोजगारांच्या संख्येत वाढ
ग्रामीण भागातील जनतेला रोहयोंतर्गत रोजगार उपलब्ध करून दिला जातो. दरवर्षी या योजनेंतर्गत काम करणाऱ्या रोजगारांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे तळागाळातील सर्वसामान्यांना रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. त्याबरोबर रोहयो कामगारांच्या मजुरीत देखील वाढ करण्यात आली आहे. शिवाय एका कुटुंबाला 100 दिवस काम देणे अनिवार्य आहे. याबाबतची जागृती रोहयो सक्षमीकरण अभियानांतर्गत केली जाणार आहे. यावेळी साहाय्यक निर्देशक बी. डी. कडेमनी, तालुका योजनाधिकारी एन. एस. होगार, तांत्रिक संयोजक मुरगेश यंकांची, रमेश मादार यासह ग्राम विकास अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.