कर्मचाऱ्यांचे आरोग्य 'कॅशलेस'
कोल्हापूर :
राज्यामध्ये एसटी महामंडळ एसटी कर्मचाऱ्यांसाठी हॉस्पिटल उभारणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतेच जाहीर केले होते. मंगळवारी त्यांनी यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची मुंबई येथील मंत्रालयात बैठक घेतली. यामध्ये एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटूंबियासाठी नव्याने उभारण्यात येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. यावेळी कोल्हापूर, पुणे, पूसद आणि वाशिम येथे पहिल्या टप्प्यात हॉस्पिटल होणार असून याचे यावेळी सादरीकरण झाले.
मंत्री सरनाईक म्हणाले, राज्यातील अनेक बसस्थानके बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्वावर विकसित करण्यात येत आहेत. या एस.टी.च्या प्रकल्पात एस.टी.कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिह्यात 25 तर मुंबईतील बोरिवली येथील जागेवर 100 खाटांचे रूग्णालय सुरू करण्यात येणार आहे. या रूग्णालयात एस.टी. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यात येणार आहेत. तसेच पाच लाखांपर्यंतच्या शस्त्रक्रियांचा खर्च राज्यशासन करेल, यामुळे इतर महाग खासगी रुग्णालयात जाऊन एसटी कर्मचाऱ्यांना खर्च करावा लागणार नाही. पुणे, कोल्हापूर, पूसद, वाशिम येथे रूग्णालय उभारण्यासंदर्भातील सादरीकरण यावेळी करण्यात आले.
प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देण्यात यावे. सर्व प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपन्यांअतर्गत चारचाकी, बाईक, टॅक्सी यांचा समावेश करण्यात येणार आहे. बाईक चालविण्यासाठी महिला चालकांनाही प्राधान्य देण्यात यावे, जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करता येईल यासाठी प्राधान्य द्यावे. तसेच त्यांच्या सुरक्षेसंदर्भात कंपन्यांनी उपाययोजना कराव्यात अशाही सूचना मंत्री सरनाईक यांनी दिल्या. खासगी वाहतूक व्यवस्था, सुस्थितीत असलेली वाहने, प्रवाशांची सुरक्षा, हेल्मेट, महिला चालकांची सुरक्षा, झीरो कमीशन सेवा इत्यादी बाबींचा वाहतूक धोरणात समावेश करण्यासंदर्भातील सादरीकरण यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनराव यांनी केले. यावेळी परिवहनचे अपर मुख्य सचिव, संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह प्रवासी वाहतुक पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
- खासगी प्रवासी वाहतुकसाठी एकच नियमावली
ओला, उबेर, रॅपिडो सारख्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच नियमावली अंतर्गत आणणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. प्रवासी सुरक्षा, कार पुलींग, लायसन्स, ट्रॅफिक समस्या यासंदर्भातील पारदर्शक तक्रार यंत्रणा तातडीने तयार करण्याचे आदेशही दिले.