धर्मवीर संभाजी चौकात अस्वच्छतेचे साम्राज्य
पुतळा परिसरात जनावरे -फेरीवाल्यांचे अतिक्रमण
बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील संभाजी महाराजांच्या मूर्ती परिसराचे बुडा अंतर्गत सुशोभिकरण करण्यात आले खरे. परंतु, त्याची योग्य निगा राखली जात नसल्याचे दृष्टीस पडत असल्याने शिवप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे या स्मारकाची योग्य निगा राखण्याची मागणी शिवप्रेमीं करत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती संभाजी चौकातील संभाजी महाराजांच्या स्मारक परिसरात वरचेवर अतिक्रमण होते. फिरते विक्रेते, रिक्षाचालक, मॅक्सीकॅब हे संभाजी महाराजांच्या स्मारकासमोरच वाहनांचे पार्किंग करतात. त्याचबरोबर काही फेरीवाल्यांनी याच ठिकाणी आपला व्यवसाय थाटला आहे. तसेच मोकाट जनावरे स्मारकाच्या आतमध्ये जात असून, त्यांच्यामुळे स्मारकात अस्वच्छता निर्माण होत आहे.
परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे
या सर्व गोष्टींचा विचार करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक स्वच्छ व नीटनेटके ठेवण्यासाठी आता प्रत्येकानेच प्रयत्न करणे गरजेचे आहे. महानगरपालिकेनेही या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.