वाघवडे-देसूर संपर्क रस्त्यावरील पुलावर खड्यांचे साम्राज्य
वाहतुकीस धोका : वाहनधारकांतून संताप : त्वरित दुऊस्त करण्याची मागणी
वार्ताहर/किणये
पश्चिम भागातील वाघवडे ते देसूर या संपर्क रस्त्यावरील पुलावर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गेल्या चार वर्षापासून या पुलाची अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी वाहनधारक व स्थानिकांतून होत आहेत. या पुलावरील वाहतूक सध्या धोकादायक बनली आहे. त्यामुळे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी या पुलावरील रस्त्याची पाहणी करून, त्याची दुऊस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
पश्चिम भागातील अनेक गावांना जोडण्यासाठी तसेच बेळगाव पश्चिम भागातील वाहनधारक व देसूर, खानापूर भागाकडे जाणाऱ्या वाहनधारकांसाठी हा संपर्क रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे. या संपर्क रस्त्यावर रोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अनेक वाहनधारक संतिबस्तवाड, किणये या भागातील गावांकडे जाण्यासाठी या रस्त्यावरून ये-जा करीत असतात. तसेच खानापूर येथील वाहनधारक शिनोळीला जाण्यासाठी देसूर, वाघवडे या संपर्क रस्त्याचा अवलंब करतात. तसेच शिनोळी-चंदगड भागातील वाहनधारक खानापूर व बेळगाव, खानापूर रस्त्यावरून वाहतूक करण्यासाठी या वाघवडे संपर्क रस्त्यावरून येतात.
पुलावर लोखंडी सळ्या बाहेर पडल्या
पुलावरील रस्त्याच्या लोखंडी सळ्या बाहेर पडलेल्या आहेत. याचा वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ख•dयांमध्ये दुचाकीस्वार अनेकवेळा पडून किरकोळ जखमी झालेले आहेत, अशी माहिती काही स्थानिकांनी दिली. रात्रीच्या वेळी या ठिकाणाहून वाहतूक करणे जोखमीचे ठरू लागले आहे, असे वाहनधारकांचे म्हणणे आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यावरील महत्त्वाच्या पुलाच्या रस्त्याची पाहणी करावी व त्याची त्वरित दुऊस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.