बेळवट्टी-बाकनूर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
प्रशासनाचे दुर्लक्ष : खड्ड्यांतून पाणी साचल्याने वाहनधारकांना त्रास : अपघाताच्या घटना : रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी
वार्ताहर /किणये
बेळवट्टी ते बाकनूर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, याचा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या चार वर्षापासून या रस्त्याच्या दुऊस्तीकडे व रस्त्याच्या डांबरीकरणाकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांतून होत आहेत. या खड्डेमय रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.बेळवट्टी, इनाम बडस ते बाकनूर हा साडेपाच किलोमीटर अंतराचा रस्ता दुर्लक्षित झालेला आहे. रस्त्याचा बहुतांश भाग पूर्णपणे उखडून गेला आहे तर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचलेले आहे. खड्डेमय रस्त्यामुळे अनेक किरकोळ अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना अनेकवेळा याबद्दल सांगूनही कानाडोळा करण्यात येऊ लागला आहे. त्यामुळे आता आपण दाद मागायची कुणाकडे, असा सवाल याठिकाणी नागरिक उपस्थित करू लागले आहेत. बेळवट्टी-बाकनूर भागातील वाहनधारकांची या रस्त्यावर रोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सध्या असलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक करणे अवघड बनले आहे.
खासदार जगदीश शेट्टर यांना दिले निवेदन
या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. नागरिकांनी या रस्त्याचे डांबरीकरण होणार असे ऐकलेले होते. मात्र ऐनवेळी रस्त्याचे कामकाज का थांबविण्यात आले आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, यासाठी खासदार जगदीश शेट्टर यांची या भागातील नागरिकांनी भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर व या भागातील नागरिक उपस्थित होते.
खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वार जखमी
या साडेपाच किलोमीटर रस्त्यावरून वाहतूक करणे म्हणजे अत्यंत धोकादायक बनले आहे. कारण खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वार पडून किरकोळ जखमी झालेले आहेत. प्रशासनामार्फत अन्य ठिकाणचे रस्ते करण्यात येतात. मग या रस्त्यासाठी योग्य असा निधी का उपलब्ध होत नाही? प्रशासनाने या रस्त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधी मंजूर करून द्यावा व त्वरित कामकाज सुरू करावे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
- म्हाळू मधुकर, ग्रा. पं. सदस्य बाकनूर