विद्यापीठात रेशीम शेती संशोधनावर भर
कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
राज्यात 20 हजारपेक्षा जास्त तर कोल्हापूर जिल्ह्यात एक हजारपेक्षा जास्त शेतकरी रेशीम शेती करतात. शिवाजी विद्यापीठात जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या 1 कोटी 34 लाख रूपयांच्या निधीतून सेंटर ऑफ सेरिकल्चर एक्स्लंस अॅण्ड इन्क्युबेशन केंद्राची स्थापना केली आहे. या केंद्रात रेशीम उद्योगावर प्रशिक्षण व संशोधन सुरू असून रेशीम शेतीचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास एक हजारपेक्षा जास्त शेतकरी रेशीम शेती करतात. यळगुड, बेले, कडगाव, गडहिंग्लज, करवीर परिसरात रेशीम शेती करणारे जास्त शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांचे रेशीम कोष तयार करण्यासाठी व विकण्यासाठी तांत्रिक शिक्षण दिले जाते. तसेच सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना रेशीम शेती आणि प्रगत तंत्रज्ञानचे शिक्षण देवून रेशीम शेती करण्यास प्रवृत्त केले जात आहे. तसेच रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या रेशीम शेतीवरील सदृश कीड नियंत्रणासाठी प्रयत्न केले जातात. कृषी पिक किड नियंत्रणावर भर देवून उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो. यातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होत असल्याने जिल्ह्यातील रेशीम शेतकऱ्यांची संख्याही वाढत आहे. प्राणीशास्त्र अधिविभागातील पदविका व पदवी अभ्यासक्रमाला राज्यासह कोल्हापुरातील कितीतरी शेतकरी व विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहचवल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली. पुर्वी कोष विक्रिसाठी बेंगलोरला जावे लागत होते, आता इचलकरंजी येथे रेशीम कोष विक्री बाजार असून येथे कोष विक्री करता येते. सध्या राज्य शासनाकडून आळ्या, अंडी आणि तुतीची रोप माफक दरात किंवा मोफतही दिली जातात. यातून शेतकऱ्यांना रेशीम शेती करण्यास मदत होत आहे, ही गोष्ट स्वागतार्ह आहे. तरीही या नाविन्यपूर्ण प्रकल्पाकडे विद्यापीठ प्रशासन आणि जिल्हा नियोजन समितीने विशेष लक्ष देवून येथील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचे काम केले पाहिजे.
सेंटर ऑफ सेरिकल्चर एक्स्लंस अॅण्ड इन्क्युबेशन अॅण्ड सेरिकल्चरची केंद्र राज्यात एकमेव आहे. त्यामुळे तत्कालीन रेशीमशास्त्रचे तज्ञ डॉ. ए. डी. जाधव, डॉ. शांताकुमार मन्ने यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर केंद्राची ख्याती पोहचवली होती. शेतकऱ्यांना रेशीम पदविका व पदवी अभ्यासक्रमांकांच्या माध्यमातून रेशीम बाजारपेठेत प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. तसेच फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांच्या शेतीच्या अडचणी सोडवल्या. म्हणूनच हा प्रकल्प राज्यभर अतिशय प्रतिष्ठेचा मानला जातो, असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.
फिरती प्रयोगशाळेला गती देण्याची गरज
फिरती प्रयोगशाळा सध्या विद्यापीठाच्या मुख्य इमारत परिसरात दिसते. शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यास खंड पडल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. कारण रेशीम शेतीच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यात सुसंवाद साधला पाहिजे. सध्या फिरती प्रयोगशाळा फक्त प्रदर्शनात दिसते. त्यामुळे फिरत्या प्रयोग शाळेला गती देवून शेतकऱ्यांच्या बांधावर गेली पाहिजे, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे.
जास्तीत जास्त रेशीम शेती होणे गरजेचे
रेशीम शेती वाढवण्यासाठी सेंटर ऑफ सेरिकल्चर एक्स्लंस अॅण्ड इन्क्युबेशन अॅण्ड सेरिकल्चरची स्थापना केली आहे. या सेंटरमध्ये जास्तीत जास्त संशोधन करून रेशीम शेतीचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अलीकडेच फिरती प्रयोगशाळा दोन कृषी प्रदर्शनाला गेली होती. सध्या जास्तीत जास्त रेशीम शेती संशोधनावर भर दिला जात आहे.
डॉ. व्ही. एन. शिंदे (कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ)