सकाम कर्मकांडाचा सर्वत्र जोर दिसून येतो
अध्याय तिसरा
योग म्हणजे आत्म्याचं परमात्म्यात मिलन हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे आणि हा योग जो साधेल त्याचा मनुष्य जन्म सार्थकी लागला असं म्हणता येईल. पहिल्या अध्यायात म्हणजे सांख्यसारार्थयोगामध्ये ज्ञानयोगी साधक कसा असतो तसेच कर्मयोगाचं महात्म्य व त्यानुसार मनुष्याची वर्तणूक कशी असावी ते बाप्पानी राजाला सांगितलं. हे जरी राजाला सांगितलं असलं तरी आपल्यालाही ते तितकंच लागू आहे. एखादी गोष्ट वारंवार समजाऊन सांगितली की, ती मनावर अधिक बिंबते हे लक्षात घेऊन बाप्पा पहिल्या दोन अध्यायात मांडलेल्या मुद्याचं सविस्तर स्पष्टीकरण या अध्यायात देतात.
इतर योनीतील प्राण्यांना विचार व आचार स्वातंत्र्य नसते पण माणसाला ते देवाने दिलेले आहे. आपण करतोय ते बरोबर आहे की, चूक हे मनुष्य ठरवू शकतो आणि त्याप्रमाणे वागूही शकतो हे लक्षात घेऊन बाप्पांचं सांगणं असं आहे की, दुर्मिळ असा मनुष्यजन्म मिळाल्यावर माणसाने स्वार्थ साधून देणाऱ्या गोष्टी करत बसून जन्म वाया न घालवता स्वत:चा उद्धार होण्यासाठी आवश्यक ते करावं म्हणजे त्याचा जन्म सार्थकी लागेल. आपण सर्व बाप्पांची लेकरे असल्याने त्यांचं आपल्यावर निरातिशय प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटीच आपलं आत्यंतिक क्षेम म्हणजे कल्याण व्हावं म्हणून बाप्पा अत्यंत कळकळीने हे सर्व सांगत आहेत. बाप्पांची ही कळकळ लक्षात घेऊन, आपली विचारसरणी आणि आचरण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे व्हावे ह्या हेतूने तिसऱ्या अध्यायाचा अभ्यास करूयात.
श्रीगजानन उवाच -
पुरा सर्गादिसमये त्रैगुण्यं त्रितनूरुहम् ।
निर्माय चैनमवदं विष्णवे योगमुत्तमम् ।। 1 ।।
अर्थ- श्रीगजानन म्हणाले, पूर्वी सृष्टीनिर्माणकाली तीन प्रकारच्या शरीरांपासून उत्पन्न होणारे त्रैगुण्य डसत्त्व, रज व तम उत्पन्न करून मी विष्णूला हा उत्तम योग सांगितला.
विवरण- या अध्यायाच्या सुरवातीला बाप्पा सांगतायत की, राजा ह्या योगाचं महात्म्य मी पूर्वीपासून सांगत आलोय. सर्वप्रथम मी ते विष्णूला सांगितलं. त्याचा पुढील प्रवास कसा झाला ते पुढील श्लोकात सांगत आहेत.
अर्यम्णे सो ब्रवीत्सो पि मनवे निजसूनवे ।
तत परम्परायातं विदुरेनं महर्षय ।। 2 ।।
अर्थ- विष्णूने त्याचं महत्त्व लक्षात घेऊन तो सूर्याला सांगितला, सूर्याने आपला पुत्र मनु याला सांगितला, तेथून परंपरेने हा योग महर्षींनी जाणला. विष्णू, सूर्य, मनु, महर्षी हे सर्व जाणकार असल्याने त्यांना त्याचे महत्त्व समजले. त्यामुळे त्यांनी तो जतन करून ठेवला.
कालेन बहुना चायं नष्ट स्याच्चरमे युगे ।
अश्रद्धेयो ह्यविश्वास्यो विगीतव्यश्च भूमिप ।। 3 ।।
अर्थ- हे राजा, बहुत काळ लोटल्यानंतर शेवटच्या युगात हा नष्ट होईल, यावर कोणाची श्रद्धा रहाणार नाही, विश्वास रहाणार नाही, ह्याची सर्वत्र निंदा होईल.
विवरण- एखाद्या गोष्टीवरील श्रद्धा उडाली की त्याबद्दल अविश्वास वाटू लागतो. कलियुगात ह्या योगाचं तसंच होईल. निरपेक्षतेनं कर्म करण्याची इच्छा लोप पावेल आणि आपोआपच ह्या योगाचं महत्व कमी होईल. अश्रद्धेमुळे ह्या युगात मी सांगितलेल्या तत्वांवर कुणाचा विश्वास राहणार नाही. निरपेक्ष कर्मे करून नंतर संन्यासयोग साधला जाईल हे कुणाला खरंसुद्धा वाटणार नाही, मग आचरणात आणायचं तर दूरच. सर्व लोक लगेच मिळणाऱ्या तात्पुरत्या फळाबाबत उत्सुकता दाखवतील व शाश्वत फळ देणाऱ्या पण दीर्घकाळ कराव्या लागणाऱ्या उपासनेबाबत निरुत्साही होतील.
सध्या आपण पाहतोच आहोत की, तात्काळ फळ मिळण्याच्या अपेक्षेने स्तोत्रपठण, आवर्तनं, अभिषेक आदि धार्मिक क्रिया जोरात दिसतात पण निरपेक्ष कर्म करण्याची कुणाची फारशी तयारी नसते.
क्रमश: