For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भावनिक साक्षरता गरजेची

06:21 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
भावनिक साक्षरता गरजेची
Advertisement

आमची मनु अगदी रडूबाई. जरा काही झालं की नुसती मुळुमुळु रडत बसणार. कधी समज यायची देव जाणे. शामची वेगळीच तऱ्हा. लहानपणापासून चिडका बिब्बाच तो. एवढा मोठ्ठा झाला तरी फार फरक नाही, अगं, एकएक प्रकारच या मुलांचे. माझे पुतणे.. एक अती विचारी आणि दुसरा पक्का आत्मकेंद्री. पुढे व्हायचं कसं? मोठे होतील तसा बदल होईल असं वाटतं आपल्याला पण लहानपणापासून या गोष्टींकडेही लक्ष हवं असंच वाटतं आता. हो गं.. अगदी खरं आहे. कधी कधी वाटतं आपणच कुठेतरी कमी पडलो. आधीपासूनच यावर काम करायला हवे होते. दोन मैत्रिणींमध्ये पार्किंगमध्ये चाललेला हा संवाद पुरेसा बोलका होता.

Advertisement

भावनिक कुशलता, भावनांचे नियोजन, हाताळणी, स्वत:च्या भावनांची जाण असणे, दुसऱ्याच्या भावना समजून घेणे, योग्य रीतीने व्यक्त होणे, भावनांवर सुयोग्य नियंत्रण या साऱ्या गोष्टींचे महत्त्व उलगडणारा होता. आपल्याला हे माहित आहे की, भावना या वर्तनासाठी, कृतीसाठी, जगण्यासाठी प्रेरीत करत असतात. यशाचा टप्पा गाठण्यामागे भावनिक हुशारीचा फार मोठा वाटा असतो. शिक्षण किंवा शैक्षणिकदृष्ट्या जसे साक्षर असणे गरजेचे आहे तसेच किंबहुना त्याहून काकणभर अधिकच भावनिकदृष्ट्या आपण साक्षर आहोत का याचा विचार आणि त्यादृष्टीने सुरुवातीपासून प्रयत्न करणे गरजेचे आहे. भावनिक प्रतिसाद, प्रतिक्रिया, भावनांची अभिव्यक्ती याबाबत सजग रहात त्यामध्ये आवश्यक ते बदल करण्याच्या दिशेने प्रयत्न करणे हे भावनिक साक्षरतेच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल ठरेल. भावना हे आपल्या जीवनातील अविभाज्य अंग आहे. अनेक गोष्टी घडविण्याचे वा बिघडविण्याचे सामर्थ्य त्यामध्ये असते. खरंतर भावनिक विकासाचे टप्पे शारीरिक विकासाच्या प्रमाणात गाठणे अपेक्षित असते.

उदा. पाऊस आल्यावर लहान मूल असेल तर ते आनंदाने उड्या मारेल, टाळया वाजवत नाचेल, पावसात भिजेल, अंगणात वा गच्चीवर इकडून तिकडे पळेल. त्याला झालेल्या आनंदाची ही अभिव्यक्ती असेल परंतु तिथे मोठी व्यक्ती असेल तिची प्रतिक्रिया वेगळी असेल. म्हणजेच जसजशी आपली शारीरिक वाढ होत असते तशी विचारांची आणि भावनांची परिपक्वता येणे अपेक्षित असते. भावना सुखद असेल वा असुखद, तिचा अनुभव वा अभिव्यक्ती करताना व्यक्तीने संयम, प्रगल्भता दाखविणे हे तिच्या भावनिक आरोग्याच्या दृष्टीने स्पृहणीय असेल.

Advertisement

भावनांचा कोंडमारा जसा त्रासदायक असतो तसा उद्रेकही हानिकारक! त्यामुळे अगदी सुरुवातीपासून याबाबत सजग असणे गरजेचे आहे. मुलांच्या भावनिक विकासाच्या दृष्टीने पालकांची भूमिका फार महत्त्वाची ठरते. पालक मुलांना कशा पद्धतीने वाढवतात, सुरक्षिततेचे अनुभव, आनंदाचे क्षण कसे देतात, मुलांना वळण लावताना स्वत: कशा पद्धतीने व्यक्त होतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे यादृष्टीने पालकांनी सुजाण असणे गरजेचे आहे. मुलांच्या हितासाठी पालक बोलत असतात. परंतु, व्यक्त होत असताना योग्य रीतीने व्यक्त होणे आवश्यक असते.

ज्यावेळी पालकांच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत नाहीत त्यावेळी उद्वेगाने अनेक गोष्टी बोलल्या जातात. घणाघाती टीका केली जाते. अनेकदा असेही होते की, स्वत:च्या पालकांकडून आपण पाल्य असताना कानी पडलेले बोल परत आपल्या स्मृतिकोषातून बाहेर येऊन तसेच उमटत असतात. त्यामुळे त्याबाबतही जागरुक असणे गरजेचे आहे. उदा. शामला आईने बाजारातून काही वस्तू आणायला सांगितल्या होत्या. शाम ते विसरला. आई चिडलीच, ‘काय भेरकटासारखा वागतो रे? तुझं हे नेहमीचंच आहे. खायचं बरं लक्षात राहतं तुझ्या. एवढं विसरायला होतंच कसं? लक्ष असतं कुठं तुझं? काय दिवे लावणार देव जाणे. आयुष्यात कधी प्रगती व्हायची नाही अशा वागण्याने. तू असाच राहणार.

आता इथे पहा हं, अशी टीका जर वारंवार झाली, होत राहीली तर त्यातून सुधारणा तर दूरच, परंतु ती व्यक्ती स्वत:ला दोषी मानू लागते, स्वत:बद्दल साशंक होतेच पण नंतर इतरांमधील दोष शोधून त्यांनाही ती फारशी किंमत देत नाही. आपण अपयशी होणार हेच ‘ब्रेन प्रोग्रॅमिंग’ तयार होते आणि पुढील वाटचाल अवघड होऊन बसते.

हीच गोष्ट शामच्या पालकांनी नीट हाताळली. सांगण्याची पद्धत थोडी बदलली म्हणजे, ‘शाम, आज परत विसरलास रे? सांगितलेलं काम महत्त्वाचं होतं, असं कर, आता नाष्टा झाला की, परत मार्केटमध्ये जाऊन ये. तुला अभ्यासाचा ताण जाणवतोय का? हल्ली दोन तीन वेळा विसरायला झालं ना? काळजी घे. पालक म्हणून अशा पद्धतीने व्यक्त होऊन विसरण्याची खबरदारी घेण्याचे शामच्या मनावर बिंबवता आले असते. पालक म्हणून आपणही योग्य रीतीने व्यक्त होत आहोत ना याचे भान आपण राखायला हवे. अगदी लहानपणापासून आपण मुलांना जशा स्वच्छतेच्या सवयी लावतो तसेच योग्य रीतीने व्यक्त होत त्यांना भावनिकदृष्टया साक्षर करणे, भावनांना योग्य वळण लावणे गरजेचे आहे. नाहीतर मग कौतुकाचे लहानपणीचे चिडके बिब्बे सवयीच्या सातत्यातून पुढे हट्टी आणि आक्रमक बनतात आणि त्याच्या परिणामाला त्या व्यक्तिसोबत तिच्या सहवासातील इतरांनाही सामोरे जावे लागते. भावनांवर योग्य नियंत्रण नसले तर विकासाच्या मार्गात अनेक समस्या अडथळा बनून उभ्या राहतात.

भावनांना योग्य रीतीने वळण लावायचे असेल तर मुळातच आपल्या मनात कोणत्या भावभावना येतात, त्या कशा कशा पद्धतीने आपल्या मनात येतात हे जर कळले तर नंतर त्याची सुयोग्य पद्धतीने हाताळणी करण्यासाठी काय केले पाहिजे याकडे लक्ष देता येईल. टीन एजमध्ये प्रवेश करताना तर याकडे लक्ष असणे फार गरजेचे आहे. ते असेल तर भावनांचा आवेग योग्य रीतीने आणि कौशल्याने सांभाळणे सोपे जाईल. भावनांची ओळख, विविध भावनांच्या विविध छटा, भावना आणि घडणारी कृती यातील फरक लक्षात येणे या गोष्टी मुलांची भावनिक हुशारी वाढविण्यास नक्कीच मदत करतील. जसे कोवळे ऊन, उन्हाची तिरिप, कडक ऊन, रणरणते ऊन किंवा मुसळधार पाऊस, रिमझिम पाऊस, पावसाची रिपरिप या सगळया निसर्गातील छटा अनुभवाच्या समृद्धीसाठी कळणे आवश्यक आहेत तसेच भावनिक समृद्धी आणि हुशारी, भावनिक कौशल्य वाढविण्यासाठी भावना, भावनेच्या छटा, तीव्रतेतील फरक कळणे फार गरजेचे आहे. उदा. दु:खाच्या विविध छटा आपण अनुभवत असतो. एखाद्या विषयात कमी गुण मिळाल्यामुळे वा परीक्षेत अपक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे होणारे दु:ख हे नापास होण्याच्या दु:खापेक्षा वेगळे असते हे कळणे महत्त्वाचे आहे. जीवनामध्ये अशा कित्येक क्लेशकारक गोष्टींना आपण सामोरे जात असतो. काही प्रसंग जरी दु:ख निर्माण करणारे असले तरी त्या त्या प्रसंगी दिले जाणारे प्रतिसाद आणि प्रतिक्रिया भिन्न असतात, हे भान असणे आणि योग्य प्रमाणात त्या दिल्या जाणे हेही महत्त्वाचे असते. एकंदरच भावनांची हाताळणी, भावनिक कौशल्य, विचार आणि भावनांचे अंतरंग साक्षीभावाने पाहता येणे हेही फार महत्त्वाचे आणि आवश्यक आहे हे मात्र खरे!!!

 -सुमेधा संजीव देसाई

Advertisement
Tags :

.