कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भावनिक हुशारीही महत्त्वाची...

06:30 AM Aug 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मॅडम मी विजय! थोडं बोलायचं होतं..

Advertisement

मॅडम अगदी बालपणापासून मी आणि माझा मित्र शाम एकत्र वाढलो. आम्ही दोघेही अभ्यासात चांगले होतो. मला तर शाळा-कॉलेजमध्ये ‘ए स्कॉलर’ अशीच हाक मारायचे. शामही हुशार होता परंतु लेखन, नाट्या, ग्रुप अॅक्टिव्हिटी हे सारं एन्जॉय करून मग अभ्यास करायचा. इंजिनिअरिंगला गेल्यावर मी पहिला आलो. तोही व्यवस्थित पास झाला. सुरुवातीपासूनच आम्ही व्यवसाय करायचा हे ठरवलं होतं. आमचं ते स्वप्न होतं म्हणा ना! एका छोट्याशा जागेत आम्ही दोघांनीही ठरल्यानुसार फूड प्रोसेसिंगच्या कामाला सुरुवात केली. जिद्द, परिश्रम आणि दर्जा याच्या बळावर हळूहळू फॅक्टरी उभी केली. गेल्या दहा वर्षात दोघांच्याही मेहनतीमुळे व्यवसायाचा आलेख उंचावत गेला. आणखी एक युनिट उभं केलं. व्याप वाढला. खरंतर सारं व्यवस्थित सेट आहे.

Advertisement

परंतु मी कुठेतरी बाजूला पडतोय का, असं हल्ली वाटत राहतं. अनेकदा असं होतं ना की साऱ्यांच्या तोंडी शामचं नाव असतं. कोणत्याही मिटिंगच्या वेळी, एक्झिबिशनच्या वेळी पाहुण्यांकडूनही त्याचीच विचारणा होते. मी नको असतो असे नाही पण पहिली विचारणा त्याची केली जाते. कामगारांना तो माझ्यापेक्षा जास्त जवळचा वाटतो. ते त्याचा विशेष आदर करतात. मला त्याच्यासारखा प्रतिसाद नसतो. खरं सांगायचं तर मला शामचा हेवा वाटत नाही. मित्र म्हणून अभिमानच वाटतो पण मी कुठेतरी कमी पडतोय, बाजूला पडतोय अशी जाणीव सतत होते. मनावर दडपण येतं. खूप अस्वस्थ वाटतं. मी नेमकं कुठे चुकतोय मॅडम? माझ्या काहीच लक्षात येत नाहीये. विजयची समस्या माझ्या लक्षात आली होती. दोन भेटीनंतर नंतर हळूहळू सारं उलगडत गेलं. त्याने एक दिवस मॅडम फॅक्टरी पाहायला या ना असं निमंत्रणच दिलं! फॅक्टरी भेटीच्या निमित्ताने शामची भेट होणार होती.

विजयची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरणार होत्या. मी ठरल्या वेळेनुसार तिथे गेले. फॅक्टरी पाहण्यासारखीच होती. अत्याधुनिक तंत्रांचा वापर, स्वच्छ, नेटकं आवार. दोघांचीही मेहनत दिसतच होती. विजयने शामचा परिचय करुन दिला. फॅक्टरीविषयी माहिती देत असताना विशिष्ट पद्धतीने संवाद साधत व्यक्त होणे आणि दुसऱ्याला कम्फर्ट करण्यात असलेली सहजता शाममध्ये दिसत होती. एकंदरच त्याचं मोकळेपणानं वागणं आणि आपल्या वर्तनाच्या माध्यमातून ‘मी आहे’ हा अश्वस्त करणारा स्वर. सहजता, यामुळे तो सर्वांनाच हवाहवासा वाटायचा. कामगारांनाही जवळचा वाटायचा.

खरंतर विजय अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचा होता परंतु नीट व्यक्त होता न येणे, स्वत:ला अलिप्त ठेवणं यामुळे तो थोडा बाजूला पडत होता. भावनिक हुशारी कमी पडत होती. तो पुन्हा भेटायला आला तेव्हा भावनिक बुद्धिमत्ता, भावनिक कौशल्य विकासासाठीचे प्रयत्न यावर सविस्तर चर्चा झाली. मी काय म्हणते आहे हे विजयच्या लक्षात आलं आणि यावर मेहनत घेत ही समस्या दूर करण्याचं त्यानं पक्क ठरवलं. नंतर काही काळ तो येत राहिला. सजगतेची काही तंत्र, आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि संवाद कौशल्यासाठी काय करता येईल यावर चर्चा झाली. कृती आराखडा तयार करण्यात आला आणि त्या दृष्टीने विजयची वाटचाल सुरू झाली.

विजयसारखी अनेक उदाहरणे अवतीभवती पाहायला मिळतात. IQ (intelligence quotient) बुद्ध्यांक वा बौद्धिक हुशारीचा संबंध अभ्यासातील प्रगतीशी जोडला गेला असल्याने समजा, एखादा मुलगा किंवा मुलगी अभ्यासात टॉपर असेल आणि वर्तनाच्याबाबतीत थोडं डावं-उजवं असेल तर दुर्लक्ष केलं जातं. कारण उत्तम बुद्धिमत्ता, अभ्यासातील यश, उत्तम जॉब ही साखळी मनात कार्यरत असते. परंतु जर भावनिक हुशारी आणि क्षमता कमी पडत असतील तर पुढे जाऊन तेवढे यश मिळेलच याची खात्री देता येत नाही. शिक्षणामध्ये भरघोस यश मिळालेला विद्यार्थी पुढे अपयशी ठरला तर त्याचा संबंध नशीबाशी जोडला जातो व एखादा अभ्यासामध्ये सर्वसामान्य वाटणारा मुलगा पुढे जाऊन उत्तम रीतीने यशस्वी झाला तर, ‘पहा हो पठ्ठ्याला नशिबाची साथ!’ असेही म्हटले जाते.

खरंतर बऱ्याचअंशी या गोष्टी EQ(Emotional quotient)भावनिक बुद्ध्यांक वा भावनिक हुशारी वरती अवलंबून असतात. `IQ gives you a job but EQ gives you promotion' या वाक्यात बरंच काही दडलं आहे, असं म्हटल्यास वावगं ठरु नये. भावनिक गुणाकांसंदर्भात गार्डनर, पीटर सॅलोव्ही, जॉन मेयर या मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने ही संकल्पना विशद केली. डॅनियल गोलमन यांनी तर भावनिक बुद्धिमत्तेवर Emotional intelligence आणि Working with Emotional intelligence ही विक्रमी खपाची दोन पुस्तके लिहिली. औद्योगिक विश्वात ही संकल्पना रुजविण्याचे श्रेय त्यांच्याकडे जातं. भावनिक हुशारी आणि यशस्वी होण्यासाठी त्याचे असलेले महत्त्व त्यांनी सांगितले आहे. केवळ अभ्यासातील हुशारी वा शैक्षणिक पात्रता व्यवहारी जीवनात यशस्वी होण्यासाठी पुरेशी नसते तर भावनिक दृष्ट्या व्यक्ती कार्यक्षम, परिपक्व असणंही तितकंच महत्त्वाचं असतं! स्व जाणीव अर्थात स्वत:च्या भावनांचं नीट आकलन होणं, व्यक्त होता येणं, त्यांची योग्य हाताळणी करणं हे जितकं महत्त्वाचं तितकंच दुसऱ्याच्या भावना समजून घेता येणे हेही महत्त्वाचं!

आजचा काळ हा तीव्र स्पर्धेचा, अस्थिरतेचा आणि विविध प्रश्नांचा सामना करायला लावणारा आहे. आजच्या गतिमान जीवनशैलीमध्ये अनेक कारणांमुळे विविध प्रश्न उभे राहताना आपण पाहतो आहोत. आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे उत्पन्न होऊन नकारात्मकता वाढू नये, त्यांना कोणत्याही समस्येला खंबीरपणे सामोरे जाता यावे, निर्णय घेता यावा यासाठी सुरुवातीपासूनच बौद्धिक हुशारी बरोबरच मुलांच्या भावनिक कौशल्य विकासासाठी, भावनिक हुशारी वाढवण्याच्या दृष्टीने पालकांनी सजग राहणे आवश्यक आहे.

आपल्याला हे ठाऊक आहे की भावना या वर्तनासाठी, कृतीसाठी, जगण्यासाठी प्रेरित करत असतात. ज्या पद्धतीने आपण मुलांना चांगले वाईट समजावून सांगतो. स्वच्छतेच्या सवयी लावतो. तसंच मुलांच्या भावनांना योग्य वळण लावण्याचा प्रयत्नही यशस्वीतेचा टप्पा गाठण्यासाठी आवश्यक आहे. सुरुवातीच्या उदाहरणातील विजयकडे बुद्ध्यांक व बौद्धिक गुणवत्ता शामपेक्षाही जास्त होती परंतु योग्य पद्धतीने व्यक्त होता न येणं, संवाद कौशल्याची कमतरता, इतरांच्या भावना जाणून घेण्याचे कसब नसल्याने तो श्यामसारखी छाप पाडू शकत नव्हता. परिणामी ती तफावत त्याला जाणवू लागली. एकंदरच भावनांची योग्य हाताळणी, स्वजाणीव, भावना कळणे त्या व्यक्त करता येणे, दुसऱ्यांच्या भावना जाणून घेणं, समजून घेणे, सभोवतालच्या परिस्थितीचा नेमका अंदाज, संवाद कौशल्य आत्मसात करणे, योग्य भावनिक प्रतिसाद, स्वत:च्या क्षमतांबरोबरच मर्यादांचीही जाण असणे, सजगता, कृतीशीलता या गोष्टी व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत. व्यक्तिगत आयुष्यातील प्रगतीसाठी, सामाजिक कार्यासाठी, नोकरी व्यवसायातील यशासाठी व्यक्तीच्या ठाई उत्तम भावनिक बुद्धिमत्ता असणे गरजेचे आहे. सुरुवातीपासून भावनांना योग्य वळण लावल्यास, भावनांचे व्यवस्थापन कौशल्य आत्मसात केल्यास यशाचा टप्पा सहजतेने गाठता येईल. बौद्धिक हुशारी आणि भावनिक हुशारीचा मेळ घातल्यास यशाचा टप्पा दूर नाही हे मात्र निश्चित!!

अॅड. सुमेधा संजीव देसाई

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article