सात दिवसांच्या गणरायांना भावपूर्ण निरोप
बेळगाव : ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत सातव्या दिवशी गणरायांना निरोप देण्यात आला. मंगळवारी सायंकाळनंतर ढोल-ताशा, तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणुका काढण्यात आल्या. त्यामुळे विसर्जन तलावांवर रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी पहावयास मिळाली. शहरासह ग्रामीण भागातही विसर्जनासाठी उत्साह दिसून आला.बुधवारी गणरायाचे थाटात आगमन झाले होते. सात दिवस मनोभावे पूजन केल्यानंतर मंगळवारी विसर्जन करण्यात आले. कपिलेश्वर येथील जुना तलाव, गोवावेस जक्कीन होंड, वडगावचा नाझर कॅम्प तलाव व अनगोळ येथील विसर्जन तलावावर मोठी गर्दी झाली होती. गणेशभक्तांनी पारंपरिक पद्धतीने सातव्यादिवशी गणरायाला निरोप दिला. मनपाकडून विसर्जन तलावांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच लाईटची व्यवस्थाही करण्यात आली होती. सायंकाळी 6 पासून मिरवणुकांना सुरुवात झाली. ढोल-ताशा, बॅन्ड, तसेच स्पीकरच्या आवाजात विसर्जन तलावांपर्यंत मिरवणुका काढण्यात आल्या. दुचाकी, ट्रॅक्टर, चारचाकी वाहनांमधून गणेशमूर्ती आणल्या जात होत्या.