For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मृत माशांमुळ देशात आणीबाणी

06:06 AM Sep 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
मृत माशांमुळ देशात आणीबाणी
Advertisement

ग्रीसच्या वोलोस शहरात मृत माशांचे अवशेष सडू लागल्याने अत्यंत भयानक दुर्गंधी पसरली आहे. तसेच माशांच्या अशाप्रकारच्या मृत्यूमुळे देशात आणीबाणी घोषित करावी लागली आहे. हवामान बदलामुळे तसेच तीव्र चक्रीवादळ आणि पूरामुळे गोड्या पाण्यातील मासे समुद्रात वाहून आले आणि तेथे ते जिवंत राहू शकले नसल्याचे मानले जात आहे.

Advertisement

वोलोस या सुंदर पर्यटनस्थळाच्या आसपासच्या पाण्यातून 100 टनापेक्षा अधिक वजनाचे मृत मासे बाहेर काढण्यात आले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या छायाचित्रे आणि व्हिडिओंमध्ये मृत मासे समुद्रात तरंगत असल्याचे आणि यामुळे पाण्याचा रंगच बदलत असल्याचे दिसून येते.

वोलोस शहरात एकाच दिवसात 57 टनापेक्षा अधिक मृत माशांना बाहेर काढण्यात आले असून सफाईचे काम अनेक दिवसांपर्यंत चालणार आहे. स्थानिक व्यवसाय, खासकरून पर्यटन उद्योगाला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. काही व्यवसायांनी तर स्वत:ची उलाढाल 80 टक्क्यांपर्यंत खालावल्याचे जाहीर केले आहे. याहून चिंतेची बाब म्हणजे पेगासिटिक खाडीच्या सागरी जीवनाला यामुळे व्यापक नुकसान पोहोचू शकते.

Advertisement

ग्रीसच्या हवामान मंत्रालयाने एक महिन्यासाठी आणीबाणी घोषित केली आहे. सरकार मृत माशांना हटविण्याचे काम जलद करण्याचा प्रयतन करत आहे. कारण या मृत माशांमुळे निर्माण झालेल्या दुर्गंधामुळे लोकांना मोठा त्रास होत आहे. मागील वर्षी थेसली क्षेत्रात आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले. या पुरामुळे 1962 मध्ये कोरड्या पडलेल्या एका सरोवरात पाणी भरल्याने त्याचा आकार तीनपट वाढला होता. प्रत्यक्षात 1962 मध्ये मलेरियाचा फैलाव रोखण्यासाठी हे सरोवर आटविण्यात आले होते. मागील वर्षी थेसलीमध्ये सुमारे 20 हजार हेक्टर मैदान पाण्याखाली गेले होते. तर नद्यांमधील मासे समुद्रात वाहून गेले होते.

यंदा सरोवरातील पाणी कमी झाल्याने मासे वोलोस बंदराच्या दिशेने आले,  गोड्या पाण्यातील हे मासे खारे पाण्यात अधिक काळ जिवंत राहू शकले नाहीत. अधिकारी आता मृत माशांना हटविण्याचे काम करत आहेत.  तर अधिक मासे समुद्रात पोहोचू नयेत म्हणून नदीच्या मुखावर जाळे लावण्यात आले आहे.

पर्यटनाला फटका

मागील वर्षी आलेल्या पूरानंतर या भागात येणाऱ्या पर्यटकांची संख्या सुमारे 80 टक्क्यांनी कमी झाली आहे. मृत माशांमुळे ही समस्या आमच्यासाठी अत्यंत घातक ठरणार असल्याचे स्थानिक संघटनेचे अध्यक्ष स्टीफनोस स्टीफानौ यांनी म्हटले आहे. तर पर्यावरणीय संकटाच्या चौकशीसाठी प्रशासनाने एक अधिकारी नियुक्त केला आहे.

Advertisement
Tags :

.