मुथ्थुट फायनान्समध्ये 26 लाखाचा अपहार
लांजा :
मुथ्थुट फायनान्स कंपनीमध्ये तारण ठेवलेले सोन्याचे दागिने कर्मचाऱ्यांनी संगनमताने बदली केल्याचा धक्कादायक समोर आला आह़े एकूण 26 लाख 81 हजार ऊपयांचा अपहार या कर्मचाऱ्यांनी केल्याचा आरोप असून त्यासंबंधी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आह़े त्यानुसार संस्थेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुथ्थुट फायनान्सच्या पाच कर्मचाऱ्यांवर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
मुथ्थुट फायनान्स कंपनीचे क्लस्टर मॅनेजर संजय चुडाजी राऊळ (44, रा. वेर्ले तळेवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 24 जून 2024 ते 5 मे 2025 या कालावधीतील हा अपहाराचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी लांजा शहरात तहसीलदार कार्यालयासमोर असलेल्या मुथ्थुट फायनान्स लिमिटेड कंपनी शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून काम करणारा सुनील तुकाराम गुरव (54, मूळ करूळ जामदारवाडी, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग, सध्या रा. कनावजेवाडी लांजा), ज्युनियर रिलेशन एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणारा प्रसाद सीताराम रामाने (28, रा. लांजा आगरवाडी), रोखपाल व ज्युनिअर रिलेशन एक्झिक्युटिव्ह सुशांत सुनील धाडवे (27, पाथरट-पाली, ता. रत्नागिरी), ओंकार दिवाकर थारळी (26, रा. मोगरे राजवाडी, ता. राजापूर) आणि ज्युनियर रिलेशन एक्झिक्युटिव्ह तुषार गजानन वाडेकर (27, रा. लांजा खावडकरवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़
मुथ्थुट फायनान्स कंपनीमध्ये सोने तारण ठेवून ग्राहकांना कर्ज वितरण करण्यात येत असत़े 24 जून 2024 ते 5 मे 2025 या कालावधीत कंपनीचे कर्मचारी असलेल्या संशयितांनी संगनमताने तारण ठेवलेल्या दागिन्यांमध्ये छेडछाड केल़ी तसेच दागिन्यांची अदलाबदली केल़ी हा सर्व प्रकार ग्राहकांच्या लक्षात येताच त्यांनी कंपनीकडे धाव घेतल़ी कंपनीकडून करण्यात आलेल्या चौकशीमध्ये कर्मचाऱ्यांनीच हा प्रकार केल्याचे उघड झाल़े
संबंधित कर्मचाऱ्यांनी ग्राहकांकडून ठेवण्यात आलेले 273.7 ग्रॅम सोन्याचे एकूण 23 लाख 96 हजार रुपये किंमतीचे दागिने बदली करून त्याजागी तेवढ्याच वजनाचे खोटे दागिने ग्राहकांना दिले. तसेच मुथ्थुट फायनान्स कंपनीची परवानगी न घेता कांता कमलाकर कुरूप यांना त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या बदल्यात 2 लाख 85 हजार ऊपये देऊन एकूण 26 लाख 81 हजार ऊपयांचा अपहार केल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आह़े
कंपनीचे जनरल मॅनेजर किरण जी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे फिर्यादी संजय राऊळ यांनी लांजा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी वरील पाचही कर्मचाऱ्यांवर लांजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 316(5), 318(4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोद संरगले करत आहेत.
- नागरिकांनी तक्रार द्यावी - पोलीस निरीक्षक
मुथ्थुट फायनान्स लांजा शाखेतील उघड झालेल्या अपहारासंदर्भात लांजा तालुक्यातील आणखी काही नागरिकांची फसवणूक झाली असेल तर याबाबत त्यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी केले आहे.