महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जम्मूमधील दहशतवादाचा नायनाट करा!

06:55 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे निर्देश : दहशतवाद संपविण्यासाठी आखली ठोस योजना

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी 16 जून रोजी दिल्लीत बैठक घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दहशतवादाला ठेचून काढण्याच्या सूचना देतानाच दहशतवादी कारवायांना मदत करणाऱ्यांवरही कडक कारवाई करा, असे निर्देश दिले. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमधील सर्व तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांवर सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवायला हवी, असेही शहा म्हणाले. 21 जून रोजी योग दिनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी 20 जून रोजी श्रीनगरला जाणार आहेत. अमरनाथ यात्राही 29 जूनपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना यात्रामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यास सांगितले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी जम्मू-काश्मीरबाबत उच्चस्तरीय सुरक्षा बैठक झाली. त्यात अमरनाथच्या आगामी वार्षिक यात्रेसाठीच्या सुरक्षा व्यवस्थेचा आणि अलीकडील दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जम्मू प्रदेशातील सध्याची सुरक्षा परिस्थिती यांचा आढावा घेण्यात आला. गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा यंत्रणांना एरिया डॉमिनेशन योजना आणि जम्मूमधील शून्य दहशतवादी योजनेद्वारे काश्मीर खोऱ्यात मिळालेल्या यशांची पुनरावृत्ती करण्याचे निर्देश दिले. गृह मंत्रालयाच्या या पवित्र्यावरून मोदी सरकार अभिनव पद्धतींद्वारे दहशतवाद्यांवर कारवाई करून आदर्श निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दिसून येत आहे.

गृहमंत्र्यांनी सर्व यंत्रणांना मिशन मोडमध्ये काम करण्यासाठी आणि समन्वित पद्धतीने त्वरित प्रतिसाद सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना केल्या. सुरक्षा यंत्रणांमधील अखंड समन्वयावर भर देत अमित शहा यांनी संवेदनशील क्षेत्रांची ओळख आणि त्यांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले.  यासोबतच अमरनाथ यात्रेसाठी संपूर्ण सुरक्षा कवच, यात्रा मार्गांवर विशेष सुरक्षा व्यवस्था, महामार्गांवर अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करणे, जम्मू-काश्मीरमधील सर्व तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांवर दक्षता घेण्याचेही आवाहन करण्यात आले. गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बोलावलेल्या या बैठकीत एनएसए अजित डोवाल, उपराज्यपाल मनोज सिन्हा, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी, एडीजीपी विजय कुमार, गृह सचिव, आयबी प्रमुख, रॉ प्रमुख, एनआयएचे डीजी, सर्व निमलष्करी दलांचे डीजी, लष्कर आणि हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर उपस्थित होते.

शांततापूर्ण निवडणुकांसाठी सुरक्षा यंत्रणांचे कौतुक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमधील शांततापूर्ण परिस्थिती आणि स्थानिक दहशतवाद्यांच्या भरतीकडे कमी झालेला ओढा यावर गृहमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच लोकांच्या विक्रमी सहभागाचे साक्षीदार असलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील लोकसभा निवडणुका सुरळीत आणि शांततेत पार पडल्याबद्दल त्यांनी सुरक्षा यंत्रणांचे कौतुक केले.

दहशतवाद निपटाऱ्यासाठी एकात्मिक योजना

केंद्रीय गृह मंत्रालयाने दहशतवादाचा निपटारा करण्यासाठी एकात्मिक योजना आखली असून त्यासंबंधी अधिकाऱ्यांना मोकळीक देत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. जम्मू आणि काश्मीर या दोन्ही विभागांमध्ये दहशतवाद्यांकडन वारंवार कुरापती सुरू असतात. या कुरापतींना स्थानिकांकडूनही खतपाणी घातले जात असल्याचे प्रकार बऱ्याचवेळा उघडकीस येतात. या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांना स्थानिकांकडून आश्रय मिळाल्यास त्यांना वेळीच अद्दल घडविण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले आहेत.

अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित

बैठकीत गृहमंत्री शहा यांनी अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसंबंधीही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. गेल्यावषी अमरनाथ यात्रेला 4.28 लाखांहून अधिक भाविक आले होते. यावेळी हा आकडा पाच लाखांवर जाऊ शकतो. विमानतळ, हेलिपॅड आणि रेल्वे स्टेशनपासून बेस पॅम्पपर्यंतच्या सर्व यात्रेकरूंच्या सुरक्षेवर शहा यांनी भर दिला आहे. अमरनाथ यात्रा 29 जूनपासून सुरू होत असून यंदा ही यात्रा 52 दिवसांची असेल. यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी केंद्राने केंद्रीय सुरक्षा दलाच्या 500 कंपन्या खोऱ्यात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरनाथ यात्रेच्या मार्गावर सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी आणि सीआयएसएफसह केंद्रीय सशस्त्र सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात केले जाणार आहे. तसेच अमरनाथ यात्रेच्या मार्गावर कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून ‘एआय’ आधारित मॉनिटरिंग केले जाईल. याआधी शुक्रवारीही गृहमंत्र्यांनी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला गृह मंत्रालयाचे अनेक अधिकारी तसेच जम्मू काश्मीर पोलिसांचे डीजीपी, सीआरपीएफचे उच्च अधिकारी आणि गुप्तचर श्रेणीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article