तहसीलदार कार्यालयातील पार्किंगचा अडसर दूर
तहसीलदारांकडून ‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल
प्रतिनिधी / बेळगाव
रिसालदार गल्ली येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारामध्ये वाहने पार्किंग करण्यास निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे रिसालदार गल्लीत निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर ‘तरुण भारत’मधून वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. याची दखल घेऊन पार्किंगसाठी पूर्वीप्रमाणे सोय करून देण्यात आली आहे.
तहसीलदार कार्यालयाच्या आवारात मनपाच्या गाळ्यांमध्ये काहीजणांनी झेरॉक्स व ऑनलाईन सर्व्हिस सेंटर थाटली आहेत. सदर व्यावसायिकांना अडचण होत असल्याने या ठिकाणी होणारे वाहनांचे पार्किंग रोखण्यात आले होते. एका बाजूचे प्रवेशद्वार बंद करून त्या ठिकाणी लाकडी ओंडका टाकण्यात आला होता. त्यामुळे विविध कामानिमित्त तहसीलदार कार्यालयाला व बेळगाव वन येथे येणाऱ्या नागरिकांना वाहने पार्किंग करण्यास अडचण होत होती.
वाहन लावण्यास जागा मिळत नसल्याने मुख्य रस्त्यावरच वाहने उभी केली जात होती. परिणामी रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होत होती. याबाबत ‘तरुण भारत’मधून वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. सदर वृत्ताची दखल घेत तहसीलदार बसवराज नागराळ यांनी होणारी गैरसोय लक्षात घेऊन वाहन पार्किंगसाठी पूर्वीप्रमाणे सोय केली आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.