कामगार कार्ड नूतनीकरणाच्या जाचक अटी दूर करा
बांधकाम कामगार संघटनेची कामगार खात्याकडे मागणी
बेळगाव : बांधकाम कामगारांच्या कार्ड नूतनीकरण करताना अनेक जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. या जाचक अटी दूर कराव्यात, तसेच कार्ड देण्याची प्रक्रिया सुलभ करावी या मागणीसाठी बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने मंगळवारी उपायुक्तांना निवेदन देण्यात आले. मजगाव येथील कामगार कार्यालयात निवेदन देऊन कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात आली. बेळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार आहेत. सेंट्रींग, गवंडी, प्लंबर, पेंटर यासह इतर कामगारांचा बांधकाम कामगारांमध्ये समावेश होतो. या कामगारांना राज्याच्या कामगार कल्याण मंडळातून विविध योजनांचा लाभ दिला जातो. परंतु मागील दोन वर्षांपासून बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणासाठी कर्ज, घर बांधकामासाठी दिला जाणारा निधी त्याचबरोबर विवाहासाठी दिला जाणारा निधीही थांबविण्यात आल्याने बांधकाम कामगारांना फटका बसला आहे.
बोगस कामगार कार्ड शोधण्यासाठी आता नवीन कार्ड देताना जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. कामगार कार्डाच्या नूतनीकरणासाठी संबंधित बिल्डिंग कंत्राटदार तसेच मालकाचेही संमती पत्र लागणार आहे. त्याचबरोबर कागदपत्रांची संख्याही वाढविण्यात आल्याने बेळगाव जिल्ह्यातील अनेक कामगार नूतनीकरणापासून दूर आहेत. त्यामुळे कामगारांना आर्थिक फटका बसत असून जाचक अटी दूर कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. बेळगाव कामगार कार्यालयाचे उपायुक्त अमरेंद्र यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष अॅड. एन. आर. लातूर, सुनील गावडे, राहुल पाटील, शितल बिलावर यासह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.