कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोव्यातील गुन्हेगारीचा बिमोड करा..!

06:50 AM Nov 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गोव्यात सध्या घडणाऱ्या खून, चोरी, दरोडे, जमीन फसवणूक, सायबर फसवणूक, ‘कॅश फॉर जॉब’ तसेच अन्य गुन्हेगारी प्रकरणांमुळे गोव्यातील कायदा-सुव्यवस्था कुठेतरी ढासळत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. गोवा म्हटले तर शांतताप्रिय राज्य. या शांतताप्रिय राज्याला अशा घटनांमुळे कुठेतरी गालबोट लागत आहे. वाढत्या गुन्हेगारीला आवर, पायबंद घालून गोवा राज्य सुरक्षित आहे, हे सिद्ध करण्याची वेळ आता आली आहे.

Advertisement

गोव्यातील दरोड्यांच्या वाढत्या घटनांमुळे म्हणा सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरत आहे, हे एक सत्य आहे. यामुळे आता योग्य खबरदारीचे उपाय आखणे आवश्यक आहे. वाढत्या दरोड्यांच्या पार्श्वभूमीवर आता ठोस कृती करणे आवश्यक आहे. पायाभूत साधनसुविधांमध्ये अव्वल म्हणविणाऱ्या तसेच पर्यटनदृष्ट्या अनेक पुरस्कारप्राप्त गोवा वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सध्या असुरक्षितच म्हणावे लागेल.

Advertisement

राज्याच्या पोलिसिंग धोरणांमध्ये सध्या व्यापक सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी गुप्तचर युनिटस स्थापन करणे आवश्यक आहे. एकेकाळी गोव्यातील घरांना धड दरवाजे, खिडक्या, कुलुपे नव्हती मात्र चोरी, दरोड्यांचे प्रमाण नव्हते. आता गोव्यातील बहुतांश घरांची जागा टोलेजंग इमारतीत, बंगले, फ्लॅटमध्ये रुपांतरित झाली आहे आणि ‘गोंयकार’ आता असुरक्षित बनत चालला आहे. एकीकडे सरकारी महोत्सव, खासगी महोत्सव तसेच देवस्थानाचे जत्रोत्सव, कालोत्सव व अन्य उत्सव साजरे होत आहेत. या उत्सवात गोमंतकीय डुंबलेला असताना दुसरीकडे गुन्हेगारी घटना घडत असल्याने ‘गोंयकार’ धास्तावलेले आहेत. यापुढे काय होईल, अशी भीती त्यांच्यामध्ये आहे. एकाकी जीवन जगणारे वृद्ध दाम्पत्यही गोव्यात अनेक आहेत. त्यांनाही वाढत्या गुन्हेगारीमुळे सध्या भीतीने ग्रासलेले आहे.

गणेशपुरी-म्हापसा येथील दरोड्यानंतर बायणा-वास्को येथील सातव्या मजल्यावरील फ्लॅटवर झालेल्या धाडसी सशस्त्र दरोड्यामुळे ‘गोंयकारां’मध्ये सध्या भीतीचे सावट पसरले आहे. गेल्या आठवड्यात सांताक्रूझ-पणजीतील अपार्टमेंटमधूनही सुमारे 25 लाख रुपयांची रोकड आणि दागिने लुटण्यात आले. टोळ्या निर्भयपणे आपले लक्ष्य निवडतात आणि आपला कार्यभाग साधून पळून जातात. बायणा-वास्को येथील घरफोडीचे प्रकरण ताजे असतानाच मंगळवार 25 नोव्हेंबर रोजी पहाटे अडीचच्या दरम्यान चावडी-काणकोण येथील प्रवीण वेर्णेकर यांच्या मालकीच्या एस. एम. ज्वेलर्स या दुकानाचे शटर वाकवून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र गस्तीवर असलेल्या काणकोण पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरांच्या हाती काहीच लागू शकले नाही. यामुळे पोलिस खऱ्या अर्थाने अभिनंदनास पात्र आहेत.

बायणा येथे सात-आठ जणांच्या टोळीने चामुंडी आर्केडमधील एका व्यावसायिकाच्या सातव्या मजल्यावरील घरात लोखंडी आणि अॅल्युमिनियमच्या रॉडने घुसखोरी केली. सोने आणि रोख रकमेच्या हव्यासापोटी हल्लेखोरांनी जोडपे, त्यांची मुलगी आणि आजारी आईसह कुटुंबांवर हल्ला चढविला आणि त्यांना गंभीर परिणामांची धमकी दिली. पीडिताच्या भावाने सांगितले की, या टोळीने इमारतीचा अभ्यास केला होता आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून वाचण्याचा प्रयत्न केला होता. तसेच सर्वांचे चेहरे मास्क व हेल्मेटने झाकलेले होते. बायणा-वास्कोतील दरोड्यात जखमी झालेल्या सागर नायक यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना शुक्रवारी सायंकाळी ‘गोमेकॉ’तून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र त्यांनी स्वत:च्याच घरात जाण्यास नकार देत आपल्या भावाच्या घरात थांबणे पसंत केले. त्या रात्रीची क्रूर घटना त्यांच्या डोळ्यासमोरून हटत नसल्यानेच त्यांना आता आपल्या आवडत्या घराचीच भीती वाटू लागली आहे.

त्यांनी शुक्रवारी ‘गोमेकॉ’मधून बाहेर पडून आपल्याला त्या दरोड्याच्या आठवणी अद्यापही सतावत असल्याचे व आपल्याच घरात प्रवेश करण्यास भीती वाटत असल्याचे सांगितले. बुरखाधारी टोळीने त्या रात्री घरात प्रवेश करून ज्या पध्दतीने त्यांच्यावर व कुटुंबातील इतर सदस्यांवर हल्ला करून लुटले, ते भीतीदायक चित्र त्यांच्या डोळ्यासमोरून काहीही केल्या हटत नाही. त्या जीवघेण्या हल्ल्यातून वाचले व ‘गोमेकॉ’तून घरी परतले तरी त्यांना त्या घटनेचा जबरदस्त धक्का बसलेला आहे. ते अद्यापही मानसिक तणावाखाली आहेत.

सध्या ते त्याच चामुंडी आर्केड इमारतीत आपल्या भावाकडे थांबले आहेत. त्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न ते व त्यांचे कुटुंब करीत आहे. चोऱ्या-माऱ्या व दरोड्यासारख्या गुन्हेगारीचे प्रकार रोखण्यासाठी कडक सुरक्षा उपाययोजना आखायला हव्यात, अशी गरज त्यांनी व्यक्त केली आहे. हा प्रसंग गंभीर स्वरुपाचा असून गृह खात्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर आरोपींना गजाआड करावे तसेच अशा घटना रोखण्यासाठी कडक सुरक्षात्मक उपाययोजनांचा अवलंब करावा, अशी मागणी ऑल गोवा एफएमसीजी अॅण्ड टेलिकॉम डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनने केली आहे. उद्योजक, व्यावसायिकांना चोरट्यांकडून लक्ष्य करण्यात येत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

बायणा-वास्कोतील सशस्त्र दरोडा प्रकरणात तिघा संशयित आरोपींना अटक करून या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिस यशस्वी ठरल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. या दरोड्यात गुंतलेल्या अन्य संशयितांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. ज्याप्रकारे गोव्यात दरोडे पडत आहेत, ते पाहता गोवा पोलिसांबाबत भीती राहिलेली नाही, पोलिसिंगमध्ये कमतरता आहे, असेच दिसून येते. नागरिकांच्या असाहाय्यतेचा फायदा घेत टोळ्या सहजतेने हल्ले करीत आहेत. गणेशपुरी-म्हापसा प्रकरणात कोणताही सुगावा लागलेला नाही. यामुळे पोलिसांची अकार्यक्षमताच दिसून येत आहे.

गोव्यात महोत्सवांचे पीक असते. यामुळे महोत्सवाच्या काळात बंदोबस्तासाठी मोठ्या संख्येने पोलिस नेमले जातात. साहजिकच पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कामाचा ताण वाढतो. त्यामुळे चोरटे, दरोडेखोरांचे फावते. कायदा-सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारी तपासासाठी स्वतंत्र यंत्रणा असणे गरजेचे आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात गुन्हेगारीला ऊत आला असून या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिस महासंचालक आलोक कुमार व इतर पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कठोर शब्दांत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचे आणि चोवीस तास सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांची यापुढे प्राधान्याने तपासणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. यासंदर्भात पोलिस अधिकारी, यंत्रणा कितपत गांभीर्याने कार्यवाही करते, हे आगामी काळात पाहावे लागेल.

‘अतिथी देवो भव’ अशी ओळख असलेल्या गोव्यात ‘मोस्ट वॉन्टेड’ कुख्यात गुन्हेगार आश्रयाला येतात. इतर राज्यातील पोलिस येथे येऊन त्यांना पकडतात व आपल्या राज्यात घेऊन जातात. याचा थांगपत्ताही गोवा पोलिसांना लागत नाही. यातून गोवा पोलिस यंत्रणा कितपत सक्षम, जागरूक आहे,

याचे दर्शन घडते. काही स्थानिक सराईत गुन्हेगारही लोकप्रतिनिधींचे कवच घेऊन फिरत असल्याने, ‘आमचे कुणी वाकडे करू शकत नाही’, अशा आविर्भावात वागत आहेत. यातून गुन्हेगारीला खतपाणी घातले जात आहे. त्यामुळे या राज्याचे काय होईल, याबाबत चिंता ग्रासत आहे. गेल्या काही महिन्यात गुन्ह्यांच्या ज्या काही घटना घडल्या, त्या पाहिल्या तर असा कोणताही गुन्ह्याचा प्रकार राहिला नाही, जो राज्यात घडला नाही. खून, दरोडे, चोऱ्या, लूट, फसवणूक, अपहरण, बलात्कार, खंडणी वसूल करणे, अमली पदार्थांचा व्यवहार असे गुन्हे घडत आहेत. या घटनांतून राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचे सिद्ध होत आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, हे खेदाने म्हणावे लागेल. गोव्यात घडणाऱ्या गुन्ह्यांचा व्यापक अभ्यास केला पाहिजे जेणेकरून प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना करता येतील. सततच्या घटनांमुळे गोव्याची प्रतिमा मलिन होत आहे. जर सुरक्षिततेच्यादृष्टीने योग्य ती खबरदारी   शकतो. मोठ-मोठ्या इव्हेन्टवर (महोत्सवांवर) खर्च करण्याऐवजी गोवा सरकारने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक निधीची तरतूद करणे योग्य ठरते. सरकारने आतातरी जागे व्हायला पाहिजे. लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. सुंदर गोवा (सोबित गोंय) सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.

राजेश परब

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article