For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मराठा आरक्षणाविरोधात 'एल्गार' मोर्चा

01:20 PM Sep 22, 2025 IST | Radhika Patil
मराठा आरक्षणाविरोधात  एल्गार  मोर्चा
Advertisement

रत्नागिरी :

Advertisement

राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी समाजाच्या आरक्षणात समाविष्ट करण्याचा घेतलेला निर्णय व हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी यामुळे कुणबी समाज आक्रमक झाला आहे. आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी कुणबी समाजोन्नती संघाच्या नेतृत्वाखाली ९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर 'एल्गार' मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला कोकणासह राज्यभरातील कुणबी संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा दिला असून मोठ्या संख्येने समाजबांधव हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे.

यावेळी कुणबी समाजाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहून सरकारला ताकद दाखवणार आहेत. मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यभरात मराठा समाजाला कुणबी दाखले दिले जात आहेत. या प्रक्रियेमुळे मूळ कुणबी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप कुणबी समाजनेत्यांनी केला आहे.

Advertisement

या आधी ओबीसी समाजाने अनेकदा मोर्चे व आंदोलनांद्वारे सरकारला इशारा दिला होता. मात्र सरकारने हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्यावर ठाम राहिल्याने आता कुणबी समाज स्वतंत्र पातळीवर 'एल्गार' मोर्चा काढून ताकद दाखवणार आहेत. मुंबई व कोकणातील सात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या कुणबी समाजाने हक्कांचे रक्षण करण्यासाठी एकजुटीने लढण्याचा निर्धार केला असून ९ ऑक्टोबरचा मोर्चा सरकारसाठी ताकद दाखवणारा ठरणार आहे. या मोर्चातून मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याच्या सरकारी निर्णयाला तीव्र विरोध करण्यात येणार असून ओबीसींसाठी जातनिहाय जनगणनेसह इतर मागण्यांवर भर दिला जाणार आहे.

सकल कुणबी समाज आणि कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई यांनी हा मोर्चा आयोजित केला आहे. महाराष्ट्रातील ३४६ ओबीसी जातींवर होत असलेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हा 'एल्गार' मोर्चा महत्वाचा असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.

  • सहभागासाठी आवाहन

समाजाच्या या मोर्चात कुणबी, ओबीसी आणि भटक्या-विमुक्त कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक 'एल्गार' मोर्चाच्या माध्यमातून ओबीसी समाजाची एकजूट आणि त्यांच्या हक्कांसाठीचा संघर्ष दर्शवला जाणार आहे

Advertisement
Tags :

.