हत्तींनी वेढला गुंजीसह कामतगा परिसर : धुमाकूळ सुरुच
भातपिकाचे प्रचंड नुकसान
वार्ताहर/गुंजी
ऐन सुगी हंगामातच गुंजीसह परिसर आता हत्तींनी वेढलेला असून हत्तींच्या नुकसानीमुळे या परिसरात हाहाकार माजला आहे. गेल्या चार-पाच दिवसापासून या ठिकाणी हत्तींनी ठाण मांडले असून दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत चालली आहे. सुरुवातीला केवळ एका हत्तीचे आगमन झाले होते. त्यानंतर पुन्हा तीन-चार हत्तींची भर पडली आणि सध्या तर या भागात एकीकडे चार तर एकीकडे पाच असे एकूण नऊ हत्तींचे दोन कळप धुमाकूळ घालत असल्याने कामतगा, वाटरा, नायकोल आणि गुंजीतील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. यातील एक कळप वाटरे, कामतगा भागात असून दुसरा कळप गेल्या चार पाच दिवसापासून गुंजी परिसरातच ठाण मांडून असल्याने येथील शेतकऱ्यांचे भातशेतीचे प्रचंड नुकसान होत आहे.
कामतगा येथील शेतकरी यशवंत जोशीलकर, नारायण पाटीलसह अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर गुंजीतील शेतकरी शंकर चौंडी, धाकुलू चौंडी, रामू शिंदोळकर या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करीत आहेत. सतत चार दिवस धाकलू चौंडी आणि रामू शिंदोळकर या शेतकऱ्यांच्या भातपिकाचे हत्तींकडून नुकसान होत असल्याने भातपीक चिखलामध्ये जाऊन सर्वत्र चिखलच चिखल पसरला आहे. काही ठिकाणी तर लोळण घेतल्याने चिखलाशिवाय दुसरे काहीच नसल्याने आता करावे काय, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
तुर्तास हत्ती हटाव मोहीम नाही
याविषयी येतील सेक्शन फॉरेस्ट राजू पवार यांना विचारले असता त्यांनी भात पिकांचे भरमसाठ नुकसान झाल्याचे कबुली दिली आहे. तसेच सकाळपासूनच या भागात पाहणी करून पंचनामे करत असल्याचे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. त्याचबरोबर हत्ती हटाव मोहिमेबद्दल विचारले असता सध्या सर्वत्र हिरवळ असल्याने जंगलातून हत्ती हटाव मोहीम हाती घेणे कठीण असल्याने तुर्तास तसा कोणताही विचार नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.