For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जळगा जंगल परिसरात हत्तीचे वास्तव्य

12:24 PM Nov 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
जळगा जंगल परिसरात हत्तीचे वास्तव्य
Advertisement

वनखात्याकडून हत्तीला स्थलांतर करणार : शिमोगा येथील तज्ञांच्या मदतीने हत्तीला पकडण्याचे नियोजन

Advertisement

खानापूर : गेल्या आठ महिन्यांपासून तालुक्याच्या पश्चिम भागातील घनदाट जंगलात वास्तव्यास असलेला हत्ती गेल्या दोन महिन्यांभरापासून पूर्व भागात आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. शहरापासून अवघ्या 4 कि. मी. अंतरावरील जळगा येथे हत्तीने गेल्या पाच दिवसांपासून वास्तव्य केले आहे. या हत्तीवर वनखाते चोवीस तास पाळत ठेवून आहेत. या हत्तीला तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पकडून शिमोगा येथील हत्तींच्या शिबिरात पाठविण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती वनाधिकारी श्रीकांत पाटील यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.

ते माहिती देताना पुढे म्हणाले, गेल्या आठ दिवसांपासून बेकवाड परिसरातील हत्तीने आपला मोर्चा चापगाव, जळगा, कारलगा परिसरात वळविला आहे. हत्तीने जळगा येथील वनखात्याच्या बांबू लागवड क्षेत्रात वास्तव्य केले आहे. जळगा, कारलगा, चापगाव परिसरातील गावातून वनखात्याने दवंडी देऊन तसेच लाऊडस्पीकरद्वारे आणि पत्रके वाटून हत्तीजवळ कोणीही जावू नये, तसेच हत्तीला हुसकावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वनखात्याकडून करण्यात आले आहे. खानापूर, लोंढा, जांबोटी या वनविभागातील 30 ते 40 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून चोवीस तास हत्तीवर पाळत ठेवण्यात आली आहे.

Advertisement

सध्या हत्ती जळगा भागात असल्याने हत्तीला पकडणे सोयीचे आहे. गेल्या आठ महिन्यांपासून हा हत्ती निलावडे पंचायत तसेच नेरसा या अती घनदाट जंगलात वास्तव्यास होता. त्यामुळे त्याला पकडणे अशक्य होते. मात्र आता हा हत्ती मानवी वस्तीजवळ आल्याने धोकादायक बनले आहे. यासाठी चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन यांच्याशी या हत्तीच्या बंदोबस्तासाठी पत्रव्यवहार सुरू असून येत्या दोन-तीन दिवसांत हत्तीला पकडून शिमोगा येथील हत्तींच्या शिबिरात पाठविण्याचे नियोजन सुरू आहे. सध्या शिमोगा येथील शिबिरात 30 हत्ती असल्याने थोडा उशीर होत आहे. मात्र येत्या दोन दिवसांत हत्तीचा निश्चित बंदोबस्त करण्यात येईल,

हत्तीला पकडण्यासाठी शिमोगा येथील वनखात्याचे पथक येणार असून या पथकात 20 कर्मचारी असणार आहेत. यात चार हत्ती, पशुवैद्यकीय तसेच माहूत आणि प्रशिक्षित वनकर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती श्रीकांत पाटील यांनी तरुण भारतशी बोलताना दिली. हत्तीला पकडून अन्यत्र हलविण्यासाठी चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन परवानगीची आवश्यकता असते. यासाठी वरिष्ठ पातळीवर तातडीचा पत्रव्यवहार सुरू आहे. हत्तीला पकडण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून सकारात्मकता दाखविण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत हत्तीला पकडून शिमोगा येथे स्थलांतरित करण्याचे नियोजन सुरू आहे. चापगाव, जळगा, करंबळ तसेच या परिसरातील नागरिकांनी हत्तीपासून दूर रहावे, त्याला पिटाळण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही वनखात्याकडून करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.