For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कामतगा येथे हत्तीकडून भात पिकांचे नुकसान

11:11 AM Oct 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
कामतगा येथे हत्तीकडून भात पिकांचे नुकसान
Advertisement

वार्ताहर/गुंजी

Advertisement

गुंजीजवळील कामतगा परिसरात हत्तीकडून भातपिकाचे नुकसान होत असून शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. पंधरा दिवसापासून शिवठाण भागात ठाण मांडलेल्या पिल्लासह एका हत्तीने आता कापोलीमार्गे कामतगा जंगलात प्रवेश करून येथील भातपिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान चालवले आहे. शुक्रवारी आणि शनिवारी रात्री येथील शेतकरी यशवंत जोशीलकर यांच्या भातपिकाचे हत्तीकडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जवळजवळ दोन एकरातील कापणीस आलेल्या भातपिकात हत्तीसह पिल्लाने खाऊन तुडवून वीस ते पंचवीस पोत्यांचे नुकसान केले आहे. तर जटगा येथील शेतकरी कल्लाप्पा मळीक यांच्या उसाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. सध्या याच परिसरात हत्ती वावरत असल्याने येथील शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.

या भागामध्ये सुगीचा हंगाम सुरू झाला असून येथील शेतकरी वर्ग भात कापणीच्या तयारीत आहे. मात्र ऐन सुगीमध्येच हत्ती आल्याने येथील शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे. वास्तविक या भागामध्ये दररोजच हत्ती वगळता इतर जंगली प्राण्यांचा उपद्रव असतो. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग भात राखण्यासाठी शेतावरच राहत असतात. मात्र हत्तीच्या आगमनामुळे शेत राखण करणेही कठीण बनले असल्याचे शेतकऱ्यांतून सांगितले जात आहे. त्यामुळे हत्तीबरोबरच इतर जंगली प्राणीही येथील शेतकऱ्यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याने शेतकरी वर्ग चिंतातुर झाला आहे. कारण वर्षभर काबाडकष्ट करून भातपीक हातातोंडाशी येत असतानाच जंगली प्राण्यांच्या पोटात जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. गतवर्षीही ऐन सुगीतच हत्तींनी धुमाकूळ घातल्याने या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

Advertisement

झटका करंटही तोडले

जोशीलकर यांनी जंगली प्राण्यांच्या उपद्रवाला अटकाव करण्यासाठी संपूर्ण शेताभोवती खांब रोवून झटका करंट लावले होते. मात्र सदर खांब मोठ्या शिताफीने मोडून तारा तोडल्या आणि हत्तींनी आत प्रवेश करून भातपिकाचा फडशा पाडला. त्यामुळे शेती संरक्षणासाठी असलेल्या एकमेव झटका करंटचाही उपयोग निष्फळ ठरल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. तरी अरण्य खात्याने त्वरित दखल घेऊन या परिसरातून हत्तींना पिटाळून लावण्यासाठी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.