नंदगड येथे हत्तींचा शेतीमध्ये धुमाकूळ सुरूच
पिकांची नासधूस : शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
वार्ताहर/हलशी
नंदगड येथे हत्तींच्या कळपांनी गेल्या चार दिवसांपासून धुमाकूळ घातला असून, खानापूर तालुक्यात हत्तींनी हैदोस घातला आहे. हत्तींनी पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या घरात भीतीचे वातावरण असून विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या हत्तींनी नंदगड परिसरातील भातपीक उद्ध्वस्त केले असून, नंदगड येथील शेतकरी मारुती मनेरकर यांच्या धरणाजवळील लागून असलेल्या शेतीमध्ये गुरुवारी रात्री भातपीक व आंबा, काजु, केळी, नारळ झाडे मोडून फेकून नासाडी केली आहे.
जर असाच हत्तींचा उपद्रव सुरू राहिल्यास नंदगड परिसरातील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हत्तींकडून भात पिकाबरोबरच ऊस पिकाचेही मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. शेतात असलेले भातपीक मातीमोल होईल. सुगीचा हंगाम असल्याकारणाने हातातोंडाशी आलेली पिके हत्तींकडून उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. तालुक्यातील या हत्तींचा बंदोबस्त होणार तरी कधी? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. शेतकऱ्यांनी सरकारकडे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची आणि हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.