गुंजी परिसरात अद्याप हत्तींचा धुमाकूळ सुरुच
आंबेवाडीत भात-ऊसासह नारळ झाडांचे नुकसान : हत्तींच्या दहशतीमुळे शेतकरी वर्ग हतबल
वार्ताहर/गुंजी
गेल्या महिनाभरापासून गुंजी परिसरात वावरणाऱ्या हत्तीनी रविवारी रात्री आपला मोर्चा आंबेवाडी गावातील शिवारात वळविला असून ऊस,केळी, नारळ आणि भात वळीचे अतोनात नुकसान केले आहे. येथील शेतकरी नारायण महादेव पाटील यांनी दिवसा भात मळणी करून पोती भरून ठेवली होती. रात्र झाल्याने हत्तींच्या दहशतीमुळे त्यांनी भाताची पोती खळ्यावरच ठेवून घरी आले. मात्र रविवारी रात्री आलेल्या पाच हत्तींनी त्यांची जवळजवळ 7 ते 8 पोती भात खाऊन विस्कटून भाताचे नुकसान केले. तसेच मळणीसाठी रचून ठेवलेले भातही खाल्ले. त्याचबरोबर कऱ्याप्पा सदाप्पा मादार या शेतकऱ्याची भात वळी खाऊन त्यांचे 4 ते 5 पोत्यांचे नुकसान केले.
तसेच केळी व नारळाची झाडेही मोडून खाऊन, बोअरवेलसाठी बसवलेल्या मोटर, पाईप आणि स्टार्टरचे पण नुकसान केल्याने जवळजवळ 40 ते 50 हजाराचे नुकसान झाले आहे. तर अशोक गोपाळ पाटील या शेतकऱ्याचा ऊस व जवळजवळ दहा ते बारा पोत्यांचे भात आणि मारुती पाटील, कृष्णा दुरीकर यांच्याही भात पिकाचे हत्तींकडून प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यापासून या परिसरात 5 हत्तींचा कळप गुंजीसह कामतगा, आंबेवाडी, तिओली, मांगीनहाळ, संगरगळी भागात वावरत आहे. संपूर्ण सुगी हंगामातच हत्तींच्या दहशतीखाली या परिसरातील शेतकरी वर्ग वावरत असून भात मळणीची कामे केवळ दिवसा करीत आहेत.
त्यामुळे मजुरांचा तुटवडा पडत असून मजुरीत वाढ झाली आहे. वर्षभर काबाडकष्ट करून इतर जंगली प्राण्यांपासून संरक्षण करून पिकवलेली शेती सध्या मळणी करून घरी नेत असताना हत्तींच्या घशात जात असल्याने येथील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. कांहीवेळा रात्री राखणदारीस जाताना हत्ती समोर दिसताच पाठलाग केल्याच्या घटना घडत असल्याने भात राखणीस जाणेही शेतकरी टाळत आहेत. त्यामुळे साहजिकच गवे आणि जंगली डुकरांचे फावत असून त्यांच्याकडूनही भात पिकांचे प्रचंड नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांतून सांगितले जात आहे. यावर्षी पेरणी हंगामात पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट आले होते. काहींनी तिसऱ्या वेळी रोप लागवडीने भात शेतीची लागण करून उशिरा पीक उभे केले होते. त्यामुळे अद्यापही अनेक शेतकऱ्यांची भात कापणी सुरूच असून हत्तींबरोबरच इतर जंगली प्राण्यांकडूनही भात पिकाचा फडशा पडला जात असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे.