For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हत्तींचीही असतात माणसांप्रमाणे नावं

06:35 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
हत्तींचीही असतात माणसांप्रमाणे नावं
Advertisement

परस्परांना बोलाविण्यासाठी करतात वापर

Advertisement

आफ्रिकेतील हत्ती स्वत:च्या पिल्ल्यांना नावं देतात आणि परस्परांना बोलाविण्यासाठी नावांचा वापर करतात. ही नावे बऱ्याच अंशी माणसांमध्ये ठेवल्या जाणाऱ्या नावांप्रमाणेच असतात. एका नव्या अध्ययनातून ही बाब समोर आली आहे. रानटी आफ्रिकन हत्तींविषयी हे संशोधन नेचर इकोलॉजी अँड इव्होल्युशन नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. हत्ती कुणाचीही नक्कल न करता दुसऱ्या हत्तींना संबोधित करण्यासाठी वैयक्तिक नावासारखा कॉल करणे शिकतो. नावासारख्या या कॉलला ओळखत ते सातत्याने त्याचा वापर करतात असे अध्ययनात म्हटले गेले आहे.

परस्परांना बोलाविण्यासाठी डॉल्फिन सिग्नेचर शिटीचा वापर करतात, पोपट देखील खास आवाज काढून परस्परांना संबोधित करताना दिसून आले आहेत. केनियात आफ्रिकन हत्तींवर करण्यात आलेल्या संशोधनानंतर ते परस्परांना ओळखणे आणि हाक मारण्यात डॉल्फिन आणि पोपटांपेक्षा सरस असल्याचे म्हटले जाऊ शकते. हत्ती एकमेकांना बोलाविण्यासाठी ज्या खास आवाजाचा सर्वाधिक वापर करतात, तो तीन श्रेणींचा असतो. यात कॉन्टॅक्ट रंबल एखादा हत्ती तेव्हा करतो, जेव्हा त्याला स्वत:च्या साथीदाराला बोलवायचे असते. दुसरी श्रेणी अभिवादनाची असून याचा वापर एखादा हत्ती अत्यंत नजीक किंवा स्पर्श करण्याच्या अंतरावर असताना केला जातो. तिसरा आवाज हा काळजीपोटी असतो.  याचा वापर हत्तीण करते, जेव्हा पिल्लाची ती देखभाल करत असते.

Advertisement

तज्ञांकडून आवाजावर अध्ययन

संशोधकांनी 1986-2022 दरम्यान अंबोसेली नॅशनल पार्क आणि सांबुरु तसेच बफेलो स्पिंग्स नॅशनल रिझर्व्हमध्ये हत्तीण आणि पिल्लांच्या जंगली समुहांच्या परस्परांना बोलाविण्यासाठी काढण्यात आलेल्या 469 आवाजांच्या रिकॉर्डिंगचे विश्लेषण केले. यासाठी तज्ञांनी मशीन लर्निंग मॉडेलचा वापर केला, ज्यात तीन प्रकारचा आवाज आढळून आला. आवाजात नावासारखे काही असल्यास कशाप्रकारे संबोधित करण्यात आले हे जाणून घेणे हा या संशोधनामागचा उद्देश होता.

हत्ती हे समोरच्या हत्तीच्या आवाजाची नक्कल करत नव्हते असे संशोधकांना आढळून आले. संशोधकांनी 17 हत्तींच्या कॉलला प्लेबॅक केले, ज्यामुळे समोरच्या हत्तीने आवाजावर कोणता प्रतिसाद दिला हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर ज्याला संबोधित करण्यात आले होते, तो हत्ती प्रतिसाद देत होता असे आढळून आल्याचे न्यूयॉर्कमधील कॉर्नेल विद्यापीठाचे पोस्टडॉक्टरल फेलो आणि संशोधनाचे प्रमुख लेखक मिकी पार्डो यांनी सांगितले.

संशोधन भविष्यासाठी उपयुक्त

हत्ती आवाज ऐकून तो स्वत:साठी आहे की नाही हे जाणतात. हत्ती परस्परांना अशाप्रकारे संबोधित करत असतील तर त्यांनी पूर्वीच परस्परांसाठी नावं निश्चित केल्याचे कळते असे पार्डो म्हणाले. हत्ती अनेक दुसऱ्या हत्तींसोबत पूर्ण आयुष्य सामाजिक बंधन राखतात. तर ते स्वत:च्या जवळच्या सामाजिक भागीदारांपासून वेगळे झाल्यावर  काही आवाजांचा वापर दूर अंतरावरील हत्तीचे लक्ष वेधून घेण्यासाठी करतात. तर नजीकच्या कॉलचा वापर सामाजिक बंधन मजबूत करण्यासाठी केला जातो असे संशोधकांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.