For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कापोली-शिवठाण भागात हत्तींचा धुमाकूळ

11:13 AM Nov 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
कापोली शिवठाण भागात हत्तींचा धुमाकूळ
Advertisement

भात पिकाचे प्रचंड नुकसान : शेतकरीवर्ग हवालदिल : भरपाईसाठी शेतकऱ्यांनीं अर्ज करण्याचे आवाहन

Advertisement

वार्ताहर/गुंजी

कापोलीजवळील शिवठाण व शिंदोळी भागामध्ये हत्तींनी धुमाकूळ घातला असून  भात पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. गेल्या आठवड्यापासून या भागात हत्तींनी ठाण मांडले असून दररोज भात पिकाचे नुकसान होत आहे. त्यामुळे येथील शेतकरीवर्ग चिंतातूर झाला आहे. सध्या या भागातील बहुतांश भातपिके कापणीला आली आहेत. मात्र सतत पावसाळी वातावरण असल्याने येथील शेतकऱ्यांनी अद्याप भात कापणीस प्रारंभ केला नाही. मात्र हतातोंडाशी आलेले भातपीक सध्या दररोज हत्तीकडून खाऊन तुडवून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. वास्तविक भात उगवणीपासूनच या भागात जंगली प्राण्यांचा उपद्रव असतो. त्यामुळे बरेच शेतकरी रात्रंदिवस शेतीची राखण करतात.

Advertisement

अशा पद्धतीने पेरणीपासून भात कापणीपर्यंत काबाडकष्टाबरोबरच रात्रंदिवस राखण केली जाते. मात्र सध्या हत्ती आल्याने शेतातील झोपड्या हत्तींचे पहिले लक्ष्य असल्याचे गृहीत धरून शेतकऱ्यांची घाबरगुंडी उडाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी राखणीस जाणे बंद केले आहे.त्यामुळे हत्तींबरोबरच इतर जंगली प्राण्यांकडूनही पिकांचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांतून सांगितले जात आहे. शिंदोळी के. एच. येथील शेतकरी श्रीकांत पाटील, शिवठाण येथील कृष्णा मिराशी, मारुती मिराशी आणि मुरारी हणमंत मिराशी यांच्या भातपिकाचे हत्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने त्यांना हजारो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. त्याचबरोबर शिवाजी मिराशी, तुकाराम मिराशी, बळीराम मिराशी व मुरारी गोविंद मिराशी यांच्याही भात पिकांचे नुकसान झाले आहे.

तीन हत्तींचा कळप

सध्या या भागामध्ये कांही शेतकऱ्यांच्या मते दोन टस्कर हत्तीसह एका पिल्लाचा समावेश आहे. तर काहींच्या मते हा पाच हत्तींचा कळप असल्याचे बोलले जात आहे. मात्र सदर हत्ती भात पिकामध्ये लोळण घेत असून आणि सध्या पाऊस सुरू असल्याने संपूर्ण भातपीक चिखलात रुतून जात असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हत्तींच्या पायांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सततच्या पावसामुळे बांधांची माती पिकावर पडल्यानेही नुकसानीत भर पडत आहे. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. याविषयी लोंढा फॉरेस्टर नंद्यापगोळ यांना दूरध्वनीवरून विचारले असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच सदर हत्तीच्या पाऊलखुणांवरून शुक्रवारी पहाटे शिवठाण भागातून रेल्वे ओलांडून माचाळी भागात हत्ती गेल्याचे त्यांनी सांगितले. भात पिकांच्या नुकसानीची पाहणी केली असून संबंधित कागदपत्रांसह नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.