चापगाव-वड्डेबैल परिसरात हत्तीचा धुमाकूळ
ऊस, भात पिकाचे मोठे नुकसान : हातातोंडाशी आलेली पिके खाऊन फस्त, बंदोबस्ताची मागणी
खानापूर : गेल्या दोन दिवसापूर्वी सागरे, नजिनकोंडल, कुणकीकोप परिसरात टस्कर हत्तीने धुमाकूळ घातला होता. हाच हत्ती बेकवाडमार्गे चापगाव येथे सोमवारी सकाळी दाखल झाला असून या हत्तीने चापगाव आणि वड्डेबैल, हडलगा परिसरात ऊस, भातपिकाचे मोठे नुकसान केले आहे. वड्डेबैल येथील तलावाच्या परिसरातील शेतात या हत्तीने सोमवारी वास्तव्य केल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चापगाव, वड्डेबैल परिसरात पहिल्यांदाच हत्ती दाखल झाला आहे. सध्या ऊस व भाताची सुगी सुरू असून भात कापणीचा हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यातच हत्ती दाखल होऊन भातपिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
चापगाव येथील शेतकरी सुभाष बेळगावकर आणि पिराजी कुऱ्हाडे, प्रल्हाद पाटील यासह इतर शेतकऱ्यांच्या भात आणि ऊस पिकांचे या हत्तीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अन्य काही शेतकऱ्यांच्या पिकांचे हत्तीकडून नुकसान करण्यात आले आहे. वनखात्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हत्तीनी केलेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी आणि हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी चापगाव, वड्डेबैल परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे. याच हत्तीने गेल्या सहा महिन्यापासून निलावडे, असोगा, नेरसा, रुमेवाडी, नंदगडसह बेकवाड परिसरात धुमाकूळ घालून आता चापगाव येथे आपला मोर्चा वळविला आहे. सहा महिन्यापासून हत्तीसह इतर जंगली प्राण्यांनी शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. मात्र अद्याप एकाही शेतकऱ्यांला वनखात्याकडून नुकसानभरपाई देण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. हातातोंडाशी आलेले भातपीक हत्तीच्या धुडगूसामुळे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. यासाठी वनखात्याने तातडीने हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.