दांडेली जवळच्या जंगलात विद्युत स्पर्शाने हत्तीचा मृत्यू
कारवार : वन्यजीवी प्रदेश व्याप्तीत येणाऱ्या दांडेली जवळच्या कुळगी-अंबीकानगर रस्त्यावरील कुळगी वनप्रदेशात विद्युत स्पर्शाने हत्तीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. 14 ते 15 वर्षांच्या मादी हत्तीचा मृत्यू मंगळवारी झाला असावा, असा संशय वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कुळगी वन्यजीवी खात्याचे कर्मचारी अरण्यप्रदेशात सेवा बजावीत असताना हत्तीचा मृतदेह आढळून आला आहे.उपलब्ध माहितीनुसार कुळगी घनदाट जंगल प्रदेशात हत्ती सागवानी झाडाला पाठ चोळत असताना किंवा सागवानी झाडाची फांदी खाण्यासाठी तोडत असताना फांदीचा स्पर्श तेथून जाणाऱ्या हाय व्होल्टेज विद्युतवाहिनीला स्पर्श झाला आणि जीव गमावून बसला. ही विद्युतवाहिनी गोव्याकडे जाते. घटनास्थळी उपसंरक्षणाधिकारी आणि वन्यजीवी खात्याचे संचालक निलेश शिंदे, सहाय्यक वनसंरक्षणाधिकारी एम. एस. कळ्ळीमठ, कुळगी आरएफओ सागर आदिंनी भेट देवून पाहणी केली. मरणोत्तर परीक्षेनंतर हत्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.