इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत 47 टक्के वाढ
मोबाइल निर्यात आघाडीवर : 12.4 अब्ज डॉलर्सची निर्यात
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत वर्षाच्या आधारावरती 47 टक्के इतकी वाढलेली पाहायला मिळाली आहे. इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरच्या तिमाहीमध्ये एकूण निर्यात 12.4 अब्ज डॉलर्सच्या मूल्याची झालेली आहे. या निर्यात वाढीमध्ये मोबाईल फोनचा वाटा सर्वाधिक राहिला असल्याचेही संस्थेने म्हटले आहे. एक वर्षाआधी समान अवधीमध्ये पाहता इलेक्ट्रॉनिक्स निर्यात 8.43 अब्ज डॉलरची झाली होती. इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमध्ये मोबाईल फोनचा वाटा सर्वाधिक असून आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीमध्ये 4.9 अब्ज डॉलर्सच्या वाढीसह आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये पहिल्या तिमाहित 7.6 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. म्हणजेच मोबाईलच्या निर्यातीमध्ये जवळपास 55 टक्के इतकी तेजी पाहायला मिळाली आहे.
इतर वस्तुंची निर्यात 37 टक्के
मोबाईल व्यतिरिक्त इतर इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमध्ये सुद्धा चांगले प्रदर्शन पाहायला मिळाले आहे. पहिल्या तिमाहीमध्ये 37 टक्के वाढीसह 4.8 अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यात आली आहे. यामध्ये सोलर मॉड्यूल, स्विचिंग आणि रुटींग डिवाइस, चार्जर अडॉप्टर आणि इतर इलेक्ट्रॉनिक घटकांचा समावेश आहे.